Video: रोहित शर्मा ने सुपर ओव्हरमध्ये सलग 2 षटकार मारल्यावर उत्साही विराट कोहली ने मैदानात धाव घेत 'हिटमॅन'ला मारली मिठी
विराट कोहली, रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

टीम इंडिया (India) सध्या न्यूझीलंडच्या (New Zealand) दौर्‍यावर असून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांचीआंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळली जात आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले आणि मालिकेचा तिसरा सामना 29 जानेवारी रोजी हॅमिल्टनच्या सेडान पार्क येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला आणि मालिका 3-0 ने खिशात घातली. सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या दोन चेंडूंत भारताला 10 धावांची गरज होती आणि टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सलग दोन षटकार लगावले. सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने षटकार मारताच कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सह उर्वरित संघाचाही आनंद गगनात मावेनासा झाला आणि सर्वांनी रोहित-केएल राहुलच्या दिशेने मैदानात धाव घेतली. (India Vs New Zealand 3rd T20: रोहित शर्मा याने शेवटच्या 2 चेंडूवर मारलेल्या षटकारांमुळे भारताचा रोमांचक विजय; पाहा व्हिडिओ)

श्रेयस अय्यर आणि विराटतर रोहितला जाऊन मिठी मारली. या विजयाचा आनंद टीम इंडियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सामना संपल्यानंतर कॅप्टन कोहलीने म्हटलेही की एका वेळी टीम इंडियाने हा सामना गमावला असल्याचे मानत होता. मात्र, मोहम्मद शमी ने अखेरच्या ओव्हरमध्ये केन विल्यमसन आणि रॉस टेलरला बाद करून सामन्याचा परिणाम बदलून टाकला. यानंतर न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 17 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 18 धावांचे लक्ष्य मिळाले. सुपर ओव्हर जिंकण्यासाठी भारताने 20 धावा केल्या. पाहा रोहितने सामना जिंकवून दिल्यावर विराटची प्रतिक्रिया:

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. रोहित आणि राहुलने भारताला शानदार सुरुवात करून दिली परंतु त्यानंतर सतत विकेट पडल्यामुळे भारताला 20 षटकांत पाच बाद 179 धावा करता आल्या. रोहितने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने 95 धावा केल्या. न्यूझीलंडने 20 षटकांत सहा विकेट गमावून 179 धावा केल्या, ज्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.