
माउंट मौंगानुईच्या बे ओव्हल येथे भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघात खेळल्या जाणार्या 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 बाद 163 धावा केल्या आणि किवी संघाला विजयासाठी 164 धावांची लक्ष्य दिले. मालिकेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियात मोठं बदल करण्यात आला. विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारताचे नेतृत्व केले. रोहितने आजच्या सामन्यात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येत धावा केल्या. त्याला केएल राहुल (KL Rahul) याची चांगली साथ मिळाली ज्याने 45 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्यांदा डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला संजू सॅमसन अपयशी ठरला आणि 2 धावा करून पॅव्हिलिअनमध्ये परतला. यजमान किवींकडून स्कॉट कुग्गेलैन याने 2 आणि हमिश बेनेट याने 1 गडी बाद केला.
राहुल आणि सॅमसनने भारतीय डावाची सुरुवात केली. मात्र, संजू 2 धाव करून बाद झाला. पुनरागमन केल्यावर सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. नंतर कर्णधार रोहित आणि राहुलने पॉवरप्लेच्या 6 षटकांत 53 धावा केल्या. सुरुवातीला धक्का बसल्यावर रोहित आणि राहुलने सावध बॅटिंग करत डाव सावरला, पण 96 धावा संख्येवर राहुल 45 धावांवर बेनेटने त्याला सॅटनरकडे झेलबाद केले. राहुलने दुसर्या विकेटसाठी रोहितबरोबर 88 धावांची भागीदारी केली. त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. यानंतर रोहितच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला 60 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर परतावे लागले. यापूर्वी, रोहितने आज आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांची नोंद केली. रोहितचे 25 वे टी-20 अर्धशतक होते. रोहितने आज अर्धशतकी डावात 3 चौकार आणि तितकेच षटकार मारले. रोहितनंतर शिवम दुबे फलंदाजीला आला, ज्याने 5 धावा केल्या. श्रेयस अय्यर 33 आणि मनीष पांडे 11 धावा करून नाबाद परतले.
दरम्यान, आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया मालिका पहिल्या 5-0 ने टी-20 मालिका जिंकण्याच्या निर्धारित आहे. जर आज भारताने विजय मिळवला तर 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत कसोटी सामने खेळणाऱ्या संघाविरुद्ध क्लीन स्वीप करणारा तो पहिला संघ ठरेल.