
टीम इंडियाने (India) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघाला 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात किवी संघाचा 5-0 असा मालिकेत क्लीन स्वीप केला आणि पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत सर्व सामने जिंकणारा हा पहिला संघ बनला. 164 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 156 धावांपर्यंत मजल मारता आली. शिवाय, टी-20 स्वरूपात न्यूझीलंडमधील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. मालिकेच्या पहिल्या चार सामन्यात कोहली सेनाने सर्व विभागात यजमानाचा पराभव केला. मग ते फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. आजच्या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतकी खेळी केली, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 3, नवदीप सैनी (Navdeep Saini) 2 याने गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदर याला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतकी डाव खेळला, पण संघाला विजय मिळवून देण्यास तो पुरेसा नव्हता. (IND vs NZ 5th T20I: शिवम दुबे ने टाकली दुसरी सर्वात महागडी ओव्हर; टीम सेफर्ट, रॉस टेलर यांनी लुटल्या 34 धावा)
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल 2 धावा करून स्वस्तात माघारी परतला. दुसरा सलामीवीर कॉलिन मुनरोला वॉशिंग्टन सुंदरने बोल्ड केले. त्याने 6 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर एकही धाव न करता टॉम ब्रुस चौथ्या ओव्हरमध्ये धावबाद झाला. या दरम्यान भारताचा अष्टपैलू शिवम दुबे याने दहाव्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा लुटवल्या. त्याच षटकात शिवमने 4 षटकार आणि 2 चौकार देत एकूण 34 धावा दिल्या. मात्र, नंतर टीम इंडियानेही पुनरागमन केले. सेफर्ट आणि टेलरने चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.
मालिकेच्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटके फलंदाजी करताना 3 गडी गमावून 163 धावा केल्या. आजच्या सामन्यासाठी नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. रोहितने नाबाद 60 धावांची खेळी केली आणि रिटायर्ड हर्ट झाला. केएल राहुल 45 धावांवर बाद झाला, तर श्रेयस अय्यर 33 आणि मनीष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले.