IND vs NZ 5th T20I: शिवम दुबे ने टाकली दुसरी सर्वात महागडी ओव्हर; टीम सेफर्ट, रॉस टेलर यांनी लुटल्या 34 धावा
शिवम दुबे (Photo Credit: Instagram)

भारताने (India) टॉस जिकून पहिले फलंदाजी करत दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची (New Zealand) अवस्था एकेकाळी 3 बाद 17 अशी झाली होती. यानंतर रॉस टेलर (Ross Taylor) आणि टिम सेफर्ट (Tim Seifert) यांनी सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडने 64 धावा केल्या आणि त्यानंतरच्या शिवम दुबे (Shivam Dube) याच्या दहाव्या ओव्हरमध्ये सेफर्ट आणि टेलरने 34 धावा लुटल्या. शिवमच्या एका ओव्हरमध्ये सेफर्टने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढल्यानंतर टेलरने पाचव्या चेंडूवर चौकार मारला, मात्र तो नोबॉल असल्याने किवी संघाला फ्रि हिट मिळाली ज्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर टेलरने षटकार लगावले आणि अशाप्रकारे शिवमच्या या एका ओव्हरमध्ये यजमान न्यूझीलंडने एकूण 34 धावा काढल्या. (IND vs NZ 5th T20I: न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा याची विक्रमी बॅटिंग, 14,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा बनला 8 वा भारतीय)

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील ही दुसरी, तर भारतीय गोलंदाजाने टाकलेली सर्वात महागडी ओव्हर ठरली. यापूर्वी, 2007 विश्वचषक सामन्यात युवराज सिंह याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 36 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांमध्ये स्टुअर्ट बिन्नी याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 मध्ये एका ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या होत्या. 2012 मध्ये पार्ट-टाइम गोलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 चेंडूत 26 धावा दिल्या होत्या.

यापूर्वी, न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय़ घेतला. नियमित कर्णधार वीर तकोहली याला विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. रोहितने आज अर्धशतकी खेळी केली आणि केएल राहुलसोबत डाव सावरला. राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहितने अर्धशतक साजरं केलं, पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. दम्यान, पहिले चारही सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात विजय मिळवून यजमान किवींविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची संधी भारताला आहे.