IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबईत जन्मलेल्या Ajaz Patel याचा ‘दस का दम’! टीम इंडियाचे सर्व 10 विकेट घेत अनिल कुंबळेची टेस्ट रेकॉर्डची केली बरोबरी
एजाज पटेल (Photo Credit: Twitter/ICC)

न्यूझीलंडचा (New Zealand) फिरकी गोलंदाज एजाज पटेलने (Ajaz Patel) कसोटी क्रिकेटमध्ये 10 बळी घेत भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेची (Anil Kumble) बरोबरी करत इतिहास रचला आहे. इंग्लंडचे माजी गोलंदाज जिम लेकर (1956) आणि माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे (1999) यांच्यानंतर एका डावात सर्व विकेट घेणारा एजाज जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) एजाजने ही कामगिरी केली आहे. त्याच्या 10 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 325 धावांवर गुंडाळला. भारताकडून मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) सर्वाधिक 150 धावा केल्या. एजाजने 47.5 षटकात 12 मेडन्स षटक फेकून 119 धावा दिल्या आणि सर्व 10 विकेट घेतल्या. अग्रवाल व्यतिरिक्त भारताचा एकाही फलंदाजाला एजाज पटेलची फिरकी समजू शकला नाही. भारतात अशी कामगिरी करणारा एजाज पहिला विदेशी गोलंदाज ठरला आहे. (IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबई कसोटीत एजाज पटेलने रचला इतिहास; भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेतल्या, टीम इंडिया 325 धावांवर ऑलआऊट)

दरम्यान एजाज पटेलपूर्वी हा कारनामा अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांनी केला होता. कुंबळेने 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता. तर ब्रिटिश क्रिकेटर जिम लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या.लक्षात घ्यायचे की ऑस्ट्रेलियाविरुद्ध लेकरने 1956 मँचेस्टर कसोटीत 53 धावां देऊन 10 विकेट घेतल्या तर कुंबळेने 1999 मध्ये दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध 74 धावांत 10 विकेट आपल्या नावे केले होते. मुंबईतच जन्मलेल्या एजाजने न्यूझीलंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कमाल करून आपले नाव इतिहासात स्वर्ण अक्षरांनी नोंदवले आहे.

कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून पटेलला कोणी रोखू शकत असेल तर तो राहुल द्रविड आहे, असा अंदाज क्रिकेट चाहते सोशल मीडियावर लावत होते. द्रविडच्या सांगण्यावरून कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला, तर एजाज या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून वंचित राहील. या प्रकरणाबद्दल मजेदार ट्विट देखील व्हायरल झाले.

कुंबळेचा रेकॉर्ड धोक्यात

दरम्यान, भारतीय डावात एजाजने कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन अश्विन यांना खातेही उघडू न देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. इतकंच नाही तर शानदार फलंदाजी करणाऱ्या मयंक अग्रवालला 150 धावांवर एजाजने तंबूत पाठवले आणि किवी संघाला मोठा दिलासा मिळवून दिला.