जयंत यादव (Photo Credit: Instagram/mumbaiindians)

IND vs NZ Test 2021 Series: टी-20 विश्वचषक आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याने स्पर्धा संपुष्टात येईल. त्यांनतर किवी संघ भारत दौऱ्यावर (New Zealand Tour of India) येणार आहे. यादरम्यान ते टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. दोन कसोटी सामने अनुक्रमे कानपूर आणि मुंबई येथे होणार आहेत. BCCI ने नुकतंच 16 सदस्यीय संघाची घोषणा केली जी न्यूझीलंडविरुद्ध खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरेल. बीसीसीआयने गेल्या सहा महिन्यांत एकामागोमाग एक मालिकेमुळे काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे खेळाडू संघातून गायब आहेत, तर विराट कोहली मुंबई येथे दुसऱ्या सामन्यातून संघात सहभागी होणार आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक खेळाडूंचा समावेश देखील पाहिला जाऊ शकतो. न्यूझीलंड कसोटीसाठी टीम इंडियाच्या संघात सरप्राईज करणाऱ्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs NZ Test 2021 Squad: न्यूझीलंड ‘कसोटी’साठी भारतीय संघ घोषित; Rohit Sharma याला सुट्टी, पहिल्या कसोटीत रहाणे कर्णधार)

1. केएस भरत (KS Bharat)

केएस भरतची निवड आश्चर्यकारक आहे कारण तो अद्याप कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळलेला नाही. यापूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी कव्हर म्हणून त्याचा समावेश करण्यात आला असला तरी त्याला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळालेली नाही. मे 2021 मध्ये त्याला रिद्धिमान साहाचा कव्हर म्हणून इंग्लंडविरुद्ध भारताच्या कसोटी संघात सामील करण्यात आले होते परंतु त्याला कोणतीही संधी मिळाली नाही. 78 प्रथम श्रेणी आणि 51 लिस्ट ए सामन्यात त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 4283 आणि 1352 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आता त्याला इलेव्हनमध्ये संधी मिळते का हे पाहणे मनोरंजक असेल.

2. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यरचा संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 22 वनडे आणि 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यानंतर त्याला पहिल्यांदा कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्याचा समावेश नक्कीच आश्चर्यचकित करणारा आहे. सर्वप्रथम अय्यर हा भारताचा व्हाईट-बॉल खेळाडू मानला जातो ज्याला वनडे आणि टी-20 चा पुरेसा अनुभव आहे. दुसरीकडे, तो त्याच्या दुखापतीनंतर आयपीएलमधून येत आहे परंतु तो नियमित लयीत नाही कारण तो संपूर्ण टी-20 विश्वचषकमध्ये राखीव खेळाडूंमध्ये बसला होता. पण असे असूनही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे. आणि आता तो त्याच्यावर खरा उतरतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

3. जयंत यादव (Jayant Yadav)

हरियाणाचा ऑफस्पिनर जो खाली क्रमवारीत बॅटने चांगले योगदान देऊ शकतो. जयंतने भारतासाठी चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला असला तरी, त्याचा समावेश आश्चर्यकारक आहे कारण तो भारताच्या नवीनतम मालिकेत कुठेही दिसला नाही. चार कसोटी सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी खेळी म्हणून 3/30 सह 11 विकेट आहेत. यादवने त्याच्या चार कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि अर्धशतक ठोकून कसोटी सामन्यांमध्ये छाप पाडली आहे. संघासाठी नवव्या क्रमांकावर पाऊल ठेवताना शतक करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याने विराट कोहलीसोबत आठव्या विकेटसाठी केलेली 241 धावांची भागीदारी केली जी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी आहे.