IND vs NZ 2021: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ‘या’ 3 स्टार खेळाडूंना मिळणार सुट्टी, T20 मालिकेतूनही बसवले बाहेर
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2021: खेळाडूंना बायो-बबल थकव्यापासून वाचवण्यासाठी भारत (India) न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पहिल्या पसंतीच्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. यंदा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (South Africa Tour) खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यातून बाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही (Rishabh Pant) निवड समितीकडून सवलत दिली जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, परंतु व्हाईट बॉल मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड अद्याप केलेली नाही. (IND vs NZ T20I 2021: हार्दिक पांड्याची टीम इंडियातुन होऊ शकते कायमची सुट्टी, ‘हा’ अष्टपैलू हिसकावू शकतो टी-20 संघात जागा)

उल्लेखनीय आहे की बुमराह, शमी आणि शार्दुल हे टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघात नाहीत पण पंतचा संघात समावेश आहे. युवा यष्टिरक्षक फलंदाज जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल झाल्यापासून बायो-बबल्सचा भाग बनला आहे आणि कसोटी मालिकेतील ब्रेकमुळे त्याला पुढील काही काळातील भारताच्या व्यस्त वेळापत्रकाच्या आधी रीफ्रेश होण्यासाठी खूप आवश्यक ब्रेक मिळेल. अलीकडेच आंतरराष्ट्रीय टी-20 कर्णधारपद सोडणारा विराट कोहलीने टी-20 मालिकेतून बाहेर बसला आहे आणि किवी संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातूनही तो बाहेर बसेल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या सामन्यासाठी संघात परतल्यावर कोहली कसोटी कर्णधार राहील पण पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांपैकी कर्णधार कोण असेल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत.

जयपूर येथे 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारत न्यूझीलंडचा पाहुणचार करणार आहे. मालिकेतील अखेरचे दोन सामने रांची आणि कोलकाता येथे अनुक्रमे 19 आणि 21 नोव्हेंबर रोजी खेळले जातील. त्यानंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये होणार असून दुसरा सामना 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.