IND vs NZ 1st Test: किवी फलंदाज Tom Latham ने 3 वेळा अंपायरच्या निर्णयाला दिले चॅलेंज, जिमी नीशमने ट्विट करून टीम इंडियाची उडवली खिल्ली
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत किवींनी पहिल्या डावात दमदार सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाने एकही विकेट न गमावता 129 धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर टॉम लॅथम (Tom Latham) 50 आणि विल यंग 75 धावा करून नाबाद खेळत आहेत. भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला होता. अशाप्रकारे यजमान भारतीय संघाकडे (Indian Team) अजूनही पहिल्या डावात 216 धावांची आघाडी आहे. दरम्यान, या सामन्यात लॅथमला नशिबाने पूर्ण साथ दिली. त्याला मैदानावरील पंचांनी तीन वेळा आऊट दिले. यानंतर त्याने तीनही वेळा DRS घेत पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि त्याला नाबाद घोषित करण्यात आले. अशाप्रकारे लॅथमने तीन वेळा पंचांना आपला निर्णय बदलायला भाग पाडले. याची दखल घेत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमने (Jimmy Neesham) टीम इंडियाची खिल्ली उडवली. (IND vs NZ 1st Test Day 2: टॉम लॅथम-विल यंगच्या जोडीची दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडच्या बिनबाद 129 धावा)

“टॉम लॅथमने येथे शतक झळकावले तर भारत घरच्या मैदानावर डीआरएस वापरण्यास नकार देऊ शकतो,” नीशमने ट्विट केले. लॅथम कसोटीत एका डावात तीन वेळा पंचांचा निर्णय उलटवणारा फलंदाज ठरला आहे. तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 345 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावाच्या आधारे किवी संघ आता भारतापेक्षा अजून 216 धावांनी पिछाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नीशमने सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय क्रिकेटपटू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो विनोदी पोस्ट्ससाठी ओळखला जातो ज्यामध्ये तो नियमितपणे क्रिकेटमधील विविध खेळाडूंवर बारीकसारीक टीका करताना दिसतो. आणि यंदा कानपुर कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने त्यांच्या डावात उत्कृष्ट सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाला ट्रोल करण्याची संधी त्याने वाया घालवली नाही.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या अर्धशतकाने त्यांना चांगली सुरुवात करून दिली पण मधली फळी गडगडल्यामुळे एकावेळी भारताची स्थिती 145 धावांवर 4 बाद अशी झाली. मात्र नवोदित श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाने 121 धावांची भागीदारी करून डावाला भारताची गाडी पुन्हा रुळावर आणली. अय्यर हा 105 धावांच्या खेळीने कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 16वा भारतीय ठरला तर जडेजानेही अर्धशतक झळकावले. अश्विनने 38 धावा केल्या.