भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मधील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाच्या काही वेळापूर्वी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट केले. पहिल्या डावाच्या आधारावर यजमान किवी टीमने भारतावर 183 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्मा (Ishant Sharma) ने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 3, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तिसऱ्या दिवशी कॉलिन डी ग्रैंडहोम (Colin de Grandhomme) 43 आणि काइल जैमीसन (Kyle Jamieson) ने 44 धावा केल्या. डी ग्रैंडहोम आणि जैमीसनमध्ये महत्वपूर्ण 71 धावांची भागीदारी झाली. दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने 300 धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी, किवी टीमकडून कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) ने सर्वाधिक 89 धावांचा डाव खेळला. टॉम लॅथम 11, ब्लंडेल 30, रॉस टेलर 44, हेनरी निकॉल्स 17, बीजे वॅटलिंग 14 धावांचे योगदान दिले. वेलिंग्टन सामना टेलरच्या टेस्ट कारकिर्दीतील 100 वा सामना आहे.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघाने विकेटसह केली. बुमराहने वॅटलिंगची विकेट घेत दिवसाचे पहिले यश संपादन केले. बुमराहने वॉटलिंगला रिषभ पंतकडे 14 धावांवर विकेटच्या मागे झेलबाद केले. यानंतर इशांतने टीम साऊथीची विकेट घेत भारताला सातवे यश मिळवून दिले. शमीने इशांतच्या चेंडूवर साऊथीचा झेल पकडला. सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 165 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 46 धावा केल्या तर मयंक अग्रवालने 34 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून पहिला कसोटी खेळात असलेल्या जैमीसनने 16 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन 4 गडी बाद केले. अनुभवी गोलंदाज टिम साऊथीने 20.1 ओव्हरमध्ये 49 धावा दिलाय आणि 4 गडी बाद केले. ट्रेंट बोल्टला एक विकेट मिळाली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी पहिला कसोटी सामना सुरू झाला. हा सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळली गेली होती. भारताने टी-20, तर किवी टीमने जोरदार पुनरागमन करत वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला.