IND vs NZ 1st Test Day 1: श्रेयस अय्यरचं पदार्पणात दमदार अर्धशतक, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया भक्कम स्थितीत; न्यूझीलंडची वाढवली डोकेदुखी
श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 1: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या कानपुर येथे पहिल्या दिवसाचा  खेळ खराब प्रकाशामुळे वेळेपूर्वीच संपुष्टात आला आहे. शुभमन गिल, पदार्पणवीर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) दिवसाखेर 84 षटकात चार विकेट गमावून 258 धावांपर्यंत मजल मारली आहे. कानपूरच्या  (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर आजच्या सामन्यात भारताकडून श्रेयसने कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात संयमी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले आणि संघाला भक्कम स्थिती पोहोचवले. शुभमन गिल 52 धावा करून बाद झाला. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस 75 धावा आणि जडेजा 50 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी आतापर्यंत काईल जेमीसनने (Kyle Jamieson) पहिल्या डावात तीन विकेट तर टिम साउदीने एक गडी बाद केला आहे. (IND vs NZ 1st Test: DRS घेऊन नुकताच बचावला होता अजिंक्य रहाणे, पण Kyle Jamieson ने पुढच्याच अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा)

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय घेत भारताकडून पहिल्या डावात गिल आणि मयंक अग्रवालची सलामी जोडीने सुरुवात केली. पण 21 धावसंख्येवर जेमीसनने यजमानांना पहिला धक्का दिला आणि अग्रवालला माघारी धाडलं. त्यानंतर गिलने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. मात्र दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडनं कमबॅक केलं आणि जेमीसनने गिल, टिम साउदीने पुजारा आणि पुन्हा जेमीसनने अजिंक्य रहाणेला बाद करून टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. भारताने चार विकेट गमावल्यावर पदार्पणवीर श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी अष्टपैलू जडेजा मैदानात उतरला. दोंघांनी सुरते हाती घेत किवी गोलंदाजांची चांगलीच क्लास घेतली. संघ अडचणीत असताना दोघांनी जबाबदारीने फलंदाजी करत दिवसाच्या अखेरीस संघाला दोनशेपार मजल मारून दिली.

यादरम्यान, अय्यरने कसोटी पदार्पणात सयंमी खेळी केली आणि संघाचा विश्वास सार्थ ठरवत दमदार अर्धशतक झळकावले. अय्यर पाठोपाठ जडेजाने देखील श्रेयसला चांगली साथ देऊन अर्धशतकी पल्ला गाठला. चांगली सुरुवात करूनही पुजारा आणि अजिंक्य रहाणेने निराश केल्यानंतर या दोघांनी 5व्या विकेटसाठी नाबाद 113 धावांची भागीदारी केली. ही मालिका अनेक खेळाडूंसाठी एक उत्तम संधी आहे जे कसोटी संघात स्थान मालवण्याच्या उंबरठ्यावर आहेत किंवा ज्यांना गेल्या काही वर्षांपासून बेंचवर बसावे लागले आहे.