IND vs NZ 1st T20I: केएल राहुल कि रिषभ पंत? न्यूझीलंडविरुद्ध टी-20 'हा' करणार विकेटकिपिंग, विराट कोहली ने केली पुष्टी
केएल राहुल आणि रिषभ पंत (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेत टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शुक्रवारी 24 जानेवारीला ऑकलंडमध्ये होणाऱ्या दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) चा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होईल कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा प्रश्न या कारणाने विचारला जात आहे कारण या सामन्याच्या एक दिवसापूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने म्हटले की न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील केएल राहुल (KL Rahul) विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळेल असे म्हटले आहे. ऑकलंडमधील सामन्याआधी कोहलीने टी-20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील प्लेइंग इलेव्हनबद्दलही महत्त्वपूर्ण सूचना दिली. केएल राहुल टी-20 मालिकेमध्ये खेळणार असून विकेटकीपिंगचीही जबाबदारी त्याच्यावर असणार असल्याचे कोहलीने स्पष्ट केले. (IND vs NZ T20I 2020: सर्वाधिक षटकार, सर्वोच्च वैयक्तिक धावा; भारत-न्यूझीलंडमधील 'हे' प्रमुख 5 टी-20 रेकॉर्डस् जाणून घ्या)

विराट म्हणाला, "केएल राहुल टी-20 मालिकेत रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात करेल, तर विकेटकीपिंगची जबाबदारीही तोच सांभाळेल." कोहली पुढे म्हणाला की वनडेमध्ये पृथ्वी शॉ रोहितसोबत डावाची सुरुवात करेल तर, राहुल पाचव्या स्थानावर येईल. “एकदिवसीय सामन्यात आम्ही राजकोटप्रमाणे खेळू आणि राहुलला 5 स्थानावर व्यक्त करण्याची संधी देऊ." त्यामुळे, पंतच्या प्लेयिंग इलेव्हनमधील समावेशावर अनिश्चितता आहे. पंत नुकतंच दुखापतीतून पुनरागमन करत आहे, त्यामुळे सध्या त्याच्या जागी मनीष पांडेची पाचव्या स्थानावर वर्णी लागू शकते.

मागील वर्षी न्यूझीलंडने टी-20 मालिकेत भारताला 2-1 ने पराभूत केले होते. टी-20 मध्ये चांगले प्रदर्शन करूनही न्यूझीलंडचा आत्मविश्वास खालावला आहे. नुकतंच त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेत 3-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया 5 टी-20, 3 वनडे आणि 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेला विशेष महत्त्व आहे कारण न्यूझीलंडमधील परिस्थिती ऑस्ट्रेलियाच्या स्थितीच्या समान असेल.