IND vs ENG 4th Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) अहमदबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या सत्रात लोकल बॉय अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपला दम दाखवला आणि इंग्लिश टीमच्या नाकीनऊ आणले. सामन्यात नाणेफेक जिंकून पाहुणा संघ पाहिले फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत एका पाठोपाठ एक विकेट्स काढल्या. यादरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) इंग्लंड कर्णधार जो रुटच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. सिराजचे रूटचा अडथळा दूर केल्यावर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्सला (Ben Stokes) सिराजने डिचवलं त्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टोक्समध्ये मैदानावर जबरदस्त वाद रंगला ज्यामुळे अखेर अंपायरना मध्यस्ती करावी लागली. इंग्लंडच्या डावातील 12व्या ओव्हर दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. (IND vs ENG 4th Test Day 1: अक्षर पटेलने बिघडवली इंग्लंडची सुरुवात; लंचपर्यंत इंग्लिश टीम 3 बाद 74 धावा, स्टोक्स-बेअरस्टो यांच्यावर मदार)
बुमराहच्या जागी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झालेल्या सिराजने 12व्या ओव्हरमध्ये रूटला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. त्यांनतर, स्टोक्सने पहिला चेंडू न खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॅटच्या कडेला लागून तो स्लिपमध्ये गेला मात्र सुदैवाने तो बचावला. यानंतर स्टोक्सकडे पाहून सिराज काहीतरी बडबडला जेणेकरून स्टोक्स संतापला. सिराजची ओव्हर संपताच ब्रेक दरम्यान विराट आणि स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाली व दोघांमधील भांडण मिटवण्यासाठी मैदानावरील अंपायरना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर, सिराजच्या पुढील ओव्हरच्या तीन चेंडूवर तीन चौकार खेचले.
What’s going on here lads? 🇮🇳🏴#INDvENG pic.twitter.com/lThox51Pp4
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 4, 2021
दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद करत यजमान भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात चमकदार सुरुवात केली. दोन्ही सलामी फलंदाजांना अक्षर पटेलने बाद केले तर सिराजने कर्णधार जो रुटला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला विजय किंवा किमान ड्रॉची आवश्यकता आहे. तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात पराभवामुळे इंग्लंडचे फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान लॉर्ड्स येथे होणार असून न्यूझीलंडने यापूर्वीच अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.