IND vs ENG 4th Test 2021: ओव्हल मैदानावरील ‘या’ 3 भारतीय शिलेदारांचा रेकॉर्ड टीम इंडियासाठी बनला चिंतेचा विषय
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल (The Oval) मैदानावर खेळला जाईल. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्यामुळे चौथी टेस्ट मॅच मनोरंजक होणार आहे. लॉर्ड्स कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाला लीड्समध्ये एका डावाने पराभव पत्करावा लागला. आता 2 सप्टेंबरपासून ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक लढत होईल. तथापि या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावरील टीम इंडियाच्या (Team India) तीन शिलेदारांच्या फॉर्म चिंतेची बाब बनला आहे. टीम इंडियाने शेवटच्या वेळी ओव्हलवर 2018 मध्ये कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये इंग्लंडने पाहुण्या संघाचा 118 धावांनी पराभव केला होता. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) त्या सामन्यात अपयशी ठरले ज्याचा सामन्याच्या निकालावर याचा मोठा परिणाम झाला. (IND vs ENG 4th Test: चौथ्या कसोटी सामन्यात 1 धाव करताच ‘हा’ विश्वविक्रम होणार विराट कोहलीच्या नावे, सचिन तेंडुलकरला बसणार धक्का)

इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि अॅलिस्टर कुकच्या 71, जोस बटलरच्या 89 आणि मोईन अलीच्या 50 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 332 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने चार विकेट्स घेतल्या तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्यानंतर बॅटने देखील भारतीय संघाची सुरुवात प्रभावी झाली नाही. दुसऱ्या षटकात शिखर धवनला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. भारताला विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराकडून आशा होत्या. मात्र, पुजारा 101 चेंडूत फक्त 39 धावा करू शकला तर कोहली 70 चेंडूत 49 धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणे धावा करवण्यात अपयशी ठरला आणि जेम्स अँडरसनने त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. हनुमा विहारीच्या 56 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 86 धावांमुळे भारताने पहिल्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून कुकने 147 धावा केल्या तर कर्णधार जो रूटने 125 धावा ठोकल्या आणि इंग्लंडने 8 गडी गमावून 423 धावांवर डाव घोषित केला. अशा प्रकारे भारताला विजयासाठी 464 धावांचे लक्ष्य मिळाले.

दुसऱ्या डावातही धवनने 1 धाव केली आणि अँडरसनच्या चेंडूवर आऊट झाला. अँडरसनने चेतेश्वर पुजाराला खाते न उघडता तीन चेंडूत बाद केले. यानंतर, पुढच्याच षटकात, ब्रॉडने पहिल्याच चेंडूवर विराटला माघारी धाडले. या सामन्याच्या पहिल्या डावात रहाणे खाते उघडण्यात अपयशी ठरले होते, त्यानंतर दुसऱ्या डावात कोहली-पुजारा भोपळा फोडू शकले नाही. केएल राहुलने 149 आणि रिषभ पंतने 114 धावा केल्या तरी दोन्ही फलंदाज भारताचा पराभव टाळू शकले नाहीत. भारत 345 धावाच करू शकला.