IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात बदल, 3 वर्षानंतर स्फोटक फलंदाजाचे पुनरागमन; भारतासाठी ठरू शकतो धोकादायक
डेविड मलान (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने (Team India) पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सवर (Lords) खेळलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंडचा (England) 151 धावांनी पराभूत केले. पराभवानंतर इंग्लिश संघाने तिसऱ्या कसोटीसाठी संघात तीन बदल केले आहेत. स्फोटक फलंदाज डेविड मलान  (Dawid Malan) आणि वेगवान गोलंदाज साकिब महमूद (Saqeeb Mahmood) यांना तिसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते. टीम इंडियासाठी हे दोन खेळाडू किती मोठा धोका निर्माण करू शकतात ते आपण जाणून घेणार आहोत. मालन तीन वर्षांनंतर इंग्लंड कसोटी संघात परतला आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडच्या एजबॅस्टन येथे भारताविरुद्ध विजयात खेळला होता. (IND vs ENG: घरच्या मातीवर कसोटी विजयासाठी इंग्लंडची तळमळ, न्यूझीलंडनंतर आता टीम इंडिया वाजवतेय रूट अँड कंपनीचा बँड)

33 वर्षीय डावखुरा फलंदाज डेविड मलानने आपल्या कारकिर्दीत 15 कसोटी सामने खेळले आहेत. शिवाय, शेवटच्या 13 कसोटी डावात त्याला फक्त 2 अर्धशतके करता आली. त्याच्या एकूण कसोटी कारकिर्दीबद्दल बोलयचे तर मालनने 26 डावांमध्ये 28 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच मालनच्या प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने चालू हंगामात फक्त एकच सामना खेळला, यामध्ये पण शानदार शतक झळकावले. यॉर्कशायरकडून खेळताना मालनने ससेक्स विरोधात 199 धावांची मोठी खेळी खेळली. यामध्ये त्याने 289 चेंडूंच्या खेळीत 22 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तेव्हापासून तो निवडकर्त्यांचे रडारवर होता. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. तो सातत्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये देखील चांगली कामगिरी करत आहे. मलानला तिसऱ्या कसोटीत नंबर-3 वर संधी मिळू शकते. हसीब हमीद रोरी बर्न्ससह सलामीला असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज साकिब महमूदचा सर्व फॉरमॅटमध्ये प्रभाव पाडल्यानंतर समावेश करण्यात आला आहे. त्याला पहिल्यांदा कसोटी संघात संधी दिली गेली आहे. पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर साकीब महमूद प्रकाशझोतात आला. चालू काउंटी हंगामात त्याने चांगली कामगिरी केली. लँकशायरकडून खेळताना महमूदने 6 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड जखमी आहे त्यामुळे जर वूड सामन्यापूर्वी तंदुरुस्त नसेल, तर शाकिबचे खेळणे निश्चित मानले जात आहे.