रिषभ पंत व एमएस धोनी (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs ENG 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) अतिशय कमी वेळात काही विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या (England) भूमीवर शतक झळकावणाऱ्या या युवा फलंदाजाने लॉर्ड्सवर (Lords) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात परदेशी भूमीवर हजार कसोटी धावांचा पल्ला गाठला आहे. विकेटकीपर-फलंदाज म्हणून हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान यष्टीरक्षक फलंदाज बनला आणि या प्रकरणात त्याने माजी अनुभवी महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मागे टाकले. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताचा पहिला डाव 364 धावांवर आटोपला. (James Anderson याची आणखी एक विक्रमी कामगिरी! लॉर्ड्स कसोटीत 5 विकेट्स घेत अश्विनला दिग्गजांच्या यादीत पछाडले)

रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या शानदार शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने शानदार सुरुवात केली. राहुलने शानदार शतक झळकावले तर रोहित 83 धावांवर बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या रिषभ पंतने 58 चेंडूत 37 धावा केल्या. या डावात त्याच्या फलंदाजीने एकूण चौकार दिसले. यादरम्यान, परदेशी भूमीवर हजार कसोटी धावा करणारा तो तिसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी अनुभवी फारुख इंजिनिअर आणि माजी कर्णधार एमएस यांनी हा कारनामा केला होता. तथापि पंतने दोघांपेक्षा कमी डावात ही खास कामगिरी केली आहे. 23 वा कसोटी सामना खेळत या यष्टीरक्षकाने एकूण 1465 धावा आहेत, त्यापैकी 1,011 धावा त्याने भारताबाहेर खेळत केल्या आहेत. तसेच भारतात खेळलेल्या सहा कसोटी सामन्यात पंतने आतापर्यंत 454 धावा काढल्या आहेत.

पंतने 29 डावांमध्ये परदेशी भूमीवर हजार कसोटी धावांचा पल्ला सर करत धोनीला मागे सोडले. माजी कर्णधार धोनीने 32 कसोटी डावात हा कारनामा केला होता. त्यापूर्वी फारुक इंजिनिअर यांनी 33 कसोटी डावांमध्ये परदेशी भूमीवर हजार धावा केल्या होत्या. दुसरीकडे, भारताच्या लॉर्ड्स येथील पहिल्या डावाबद्दल बोलायचे तर टीम इंडियाचा पहिला डाव 364 धावांवर आटोपला. भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक 129 धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने 83 आणि कोहलीने 42 धावांचे योगदान दिले.