टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 1: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस पाहुण्या संघाच्या नावावर राहिला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत व यजमान संघाचा पहिला डाव 65.4 ओव्हरमध्ये 183 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलची (KL Rahul) जोडी सलामीला उतरली. दोघांनी दिवसाखेर टीम इंडियाला  (Team India) एकही धक्का बसू न देता पहिल्या दिवसाखेर 13 ओव्हरमध्ये 21 धावा केल्या. यासह भारत इंग्लंडच्या पहिल्या डावात 162 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 9 धावा व राहुल 9 धावा करून खेळत होते. (IND vs ENG 1st Test Day 1: जो रूटची एकाकी झुंज, पहिल्या डावात इंग्लंड 183 धावांवर ढेर; भारतीय गोलंदाजांची आक्रमक कामगिरी)

सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटिश कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकला आणि पहिले भारतीय संघाला (Indian Team) पहिले गोलंदाजी करण्यास सांगितले. पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला आणि संपूर्ण यजमान संघ भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अवघ्या 183 धावांवर गारद झाला. कर्णधार जो रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 4 तर मोहम्मद शमीने 3 बळी घेत इंग्लंडचा डाव पहिल्याच दिवशी संपुष्टात आणला. दिवसाच्या अखेरच्या सत्रात यजमान फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. डॅन लॉरेन्स व जोस बटलर भोपळाही फोडू शकले नाही. शिवाय, संघाचा सलामीवीर रोरी बर्न्सला बुमराहने शून्यावर तंबूत धाडलं.

कर्णधार रूटने एका बाजूने संयमी खेळी करत अर्धशतकी पल्ला गाठला पण त्याला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही. रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने इंग्लंडला शंभरी पार करून दिली. दरम्यान, जो रुट इंग्लंडचा  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. त्याने या यादीत माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला मागे टाकले आहे. दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या सामन्यात भारताने फिरकीपटू म्हणून फक्त रवींद्र जडेजाचा समावेश केला आहे तर दुखापतग्रस्त मयंक अग्रवालच्या जागी केएल राहुल सलामीला उतरला आहे.