
IND vs ENG 1st Test Day 4: नॉटिंगहम (Nottingham) येथे सुरु असलेल्या भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. आज चौथ्या दिवशी सामना अतिशय मनोरंजक स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात 183 धावा केलेला यजमान ब्रिटिश संघाने दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटच्या (Joe Root) 109 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 303 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 209 धावांचे आव्हान दिले. अशाप्रकारे चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने एक बाद 52 धावा केल्या असून ते विजयापासून आणखी 157 धावा दूर होता. दिवसाखेर रोहित शर्मा 12 धावा तर चेतेश्वर पुजारा 12 धावा करून खेळत होता. दुसरीकडे हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 209 धावांच्या आत भारताचे 9 गडी बाद करावे लागतील. (IND vs ENG 1st Test 2021: ‘याला सेलिब्रेशन म्हणतात’! बेअरस्टोला बाद केल्यानंतर Mohammed Siraj ने दाखवला स्वॅग)
दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या सलामी जोडीने बिनबाद 25 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. पण दिवसाच्या तिसऱ्या सत्रात रूट वगळता अन्य फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ भारताविरुद्ध मोठी आघाडी घेण्यात अपयशी ठरला. आता सामन्याच्या पाचव्या व अंतिम दिवसाचा खेळ शिल्लक असताना कोणता संघ नक्की बाजी मारतो की सलामीचा सामना अनिर्णित राहतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून असणार आहे. रूट वगळता दुसऱ्या डावात ब्रिटिश संघासाठी सॅम कुरनने 32 आणि जॉनी बेअरस्टोने 30 धावांचे छोटेखानी योगदान दिले. याशिवाय फलंदाज तिशीचा आकडा देखील स्पर्ध करू शकले नाही. दुसरीकडे, भारताकडून वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग करत यजमान संघाला दुसऱ्या डावात 303 धावांवर गुंडाळलं.
यापूर्वी सामन्यात टॉस जिंकून इंग्लिश कर्णधार जो रूटने फलंदाजीचा निर्णय घेतला पण तो त्याच्या अंगाशी आला. स्वतः रूटला वगळता पहिल्या डावात देखील सर्व मात्तबर फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली आणि टीम फक्त 183 धावांवर ढेर झाला. प्रत्युत्तरात 278 धावा करत टीम इंडियाने पहिल्या डावात 95 धावांची नाममात्र आघाडी घेतली होती ज्याचा फायदा त्यांना दुसऱ्या डावात झाला आणि त्यांना दोनशे पार धावांचे लक्ष्य मिळाले.