IND vs ENG 1st Test Day 2: जो रूटची ऐतिहासिक द्विशतकी खेळी, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची 8 विकेट गमावून 555 धावांपर्यंत मजल
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test Day 2: इंग्लंड कर्णधार जो रूटचे (Joe Root) विक्रमी द्विशतक, डॉम सिब्ली (Dom Sibely) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाविरुद्ध (Team India) 8 विकेट गमावून 555 धावांचा डोंगर उभारला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा डोम बेस (Dom Bess) 28 आणि जॅक लीच 8 धावा करून खेळत होते. चेन्नईच्या (Chennai) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करत इंग्लिश फलंदाजांना माघारी पाठवलं पण, विरोधी संघाने यापूर्वीच मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. रूटने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले आणि सर्वाधिक 218 धावा केल्या तर सिब्लीने 87 आणि स्टोक्सने 80 धावांची खेळी करत रूटला चांगली साथ दिली. रूटने आपल्या द्विशतकी खेळीत सिब्लीसह पहिले 200 आणि दुसऱ्या दिवशी स्टोक्ससह शतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्याकडे नेले. भारताकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा (Ishant Sharma), शाहबाझ नदीम यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 1st Test 2021: Joe Root याचा डबल ब्लास्ट, भारताविरुद्ध दुहेरी शतक ठोकत रचला इतिहास)

दुसऱ्या दिवशी रूट आणि स्टोक्सच्या जोडीने पहिल्या सत्रात संघाला झटका लागू न देता आक्रमक भूमिका घेत फलंदाजी केली. रुटने 377 चेंडूत 19 चौकार आणि 2 षटकारासह 218 धावा केल्या. रुट, स्टोक्स आणि सिब्लीच्या खेळीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत पोहचला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 3 बाद 263 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. रूटने 260 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. सलग तीन सामन्यात त्याने 150 किंवा अधिक धावा केल्या आहे. त्यानंतर, स्टोक्सने केवळ 73 चेंडूत 23वे अर्धशतक पूर्ण केले. रूट आणि स्टोक्सची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना नदीमने स्टोक्सला 82 वैयक्तिक धावसंख्येवर चेतेश्वर पुजाराकडे झेलबाद केले. स्टोक्स बाद झाल्यावर रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100व्या सामन्यात षटकार खेच द्विशतक पूर्ण केलं.

ओली पोपच्या रुपात इंग्लंडला पाचवा धक्का बसला आहे. पोपने  34 धावांची खेळी केली, त्यानंतर अखेर रूट 377 चेंडूत 19 चौकार आणि 2 षटकारासह 218 धावांवर माघारी परतला. नदीमने रुटला एलबीडब्लयु आऊट केलं. यादरम्यान, इंग्लंडने 500 धावांचा टप्पा ओलांडला असताना इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये इंग्लिश टीमला दोन झटके दिले आणि सलग दोन चेंडूवर जोस बटलर आणि जोफ्रा आर्चरला बाद केलं. बटलरने 30 धावा केल्या तर आर्चरचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला.