IND vs ENG 1st Test Day 1: डॉम सिब्ली-जो रूट यांच्या फटकेबाजीपुढे भारतीय गोलंदाजांची शरणागती, पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा स्कोर 263/3
डॉम सिब्ली आणि जो रूट (Photo Credit: Twitter/@englandcricket)

IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील पहिल्या चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दिवसाखेर इंग्लंडने डॉम सिब्लीचे (Dom Sibley) संयमी अर्धशतक आणि कर्णधार जो रूटच्या (Joe Root) ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर 3 बाद 263 धावांपर्यत मजल मारली. रूट आणि सिब्ली यांच्यातील शतकी जोडीपुढे भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. अशास्थितीत, दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिब्ली 87 आणि रूट नाबाद 128 धावा करून खेळत आहे. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सुरुवातीला दोन झटके दिल्यानंतर रूट आणि सिब्लीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचा संयमीपणे सामना करत अखेरच्या दोन सत्रात वर्चस्व गाजवले. भारताकडून दिवसाखेर रविचंद्रन अश्विन ला 1 आणि जसप्रीत बुमराहला 2 विकेट मिळाली. (IND vs ENG 1st Test Day 1: Joe Root याचा मास्टरस्ट्रोक, फलंदाजांच्या एलिट यादीत थेट समावेश, 100 व्या टेस्ट सामन्यातील ऐतिहासिक शतक ठरले महत्त्वपूर्ण)

नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत रॉरी बर्न्स आणि सिब्लीने इंग्लंडला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली पण 33 धावांच्या वैयक्तिक धावांवर आर अश्विनच्या चेंडूवर बर्न्स विकेटच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने इंग्लिश संघाला आणखी एक झटका दिला. भारतात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराहने डॅन लॉरेन्सला शुन्यावर माघारी धाडलं. मात्र, नंतर रूट आणि सिब्लीच्या जोडीपुढे भारतीय गोलंदाज निरुत्तर दिले. संघ अडचणीत असताना दोंघांनी द्विशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला व संघाला सामन्यात वर्चस्व मिळवून दिलं. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी झुंजार अर्धशतकी खेळी केली आहे. ज्यानंतर रूटने धावसंख्येचा वेग वाढवला आणि संघाने अडीचशे धावसंख्या पार केली. मात्र, दिवसाच्या शेवटच्या षटकात बुमराहने सिब्लीला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला.

आज, 5 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियासाठी विराट कोहली आणि इशांत शर्मा यांनी कमबॅक केलं तर शाहबाझ नदीमला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, इंग्लंडसाठी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी टेस्ट संघात पुनरागमन केलं आहे.