भारताविरुद्ध (India) चेन्नई (Chennai) येथे आपला 100वा टेस्ट सामना खेळणाऱ्या इंग्लंड कर्णधार जो रूटने (Joe Root) शंभरी धावसंख्या गाठली आणि फलंदाजांच्या एलिट यादीत स्थान पटकावले. टीम इंडियाविरुद्ध (Team India) रूटने 110 चेंडूत कसोटी सामन्यात सलग तिसरे शतक ठोकले. यापूर्वी रूटने श्रीलंकाविरुद्ध 228 आणि 186 धावा केल्या होत्या. आपला 100वा कसोटी सामना खेळत शतकी धावसंख्या गाठणाऱ्या काही मोजक्या फलंदाजांच्या यादीत आता रूटचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, पाकिस्तानचे जावेद मियांदाद व इंझमाम-उल-हक, इंग्लंडचे माजी फलंदाज कॉलिन कौड्रे आणि अॅलेक स्टीवर्ट, वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रिम स्मिथ व हाशिम आमला यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये हा मैलाचा दगड गाठणारा 9वा फलंदाज ठरला. रूटचे भारतातील हे दुसरे तर एकूण टेस्ट करिअर मधील 20वे शतक ठरले. (IND vs ENG 1st Test 2021: Joe Root याने पूर्ण केले टेस्ट सामन्यांचे शतक, डेब्यू व 50व्या टेस्टनंतर इंग्लंड कर्णधारचा चेन्नई येथे कारनामा, वाचा सविस्तर)
दुसरीकडे, आजच्या सामन्यात रूटने आणखी एक मैलाचा दगड गाठला. रुट सर्वात कमी वयात 100 टेस्ट खेळणारा तिसरा खेळाडू आहे. अॅलिस्टर कुक सर्वात कमी वयात 100 टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू आहे. कुकने 28 वर्ष 353 दिवसात 100वा कसोटी सामना खेळला होता. तर सचिन तेंडुलकरने वयाच्या 29 वर्ष 134 दिवशी 100 कसोटी खेळण्याचा कारनामा केला होता. सचिनने 2002 मध्ये ही कामगिरी केली होती. आणि आता रूटने ता दिग्गजांच्या यादीत स्थान पटकावले. रुटने 30 वर्ष 37 दिवशी ही विशेष कामगिरी केली आहे. योगायोगाने, रूटने भारताविरुद्ध देखील पहिला आणि 50वा कसोटी सामना खेळला होता. आणि एकाच देशाविरुद्ध पदार्पण आणि 100वा कसोटी सामना खेळणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. रूटने 2012 मध्ये भारताविरुद्ध सामनातून कसोटी पदार्पण केले होते. कार्ल हूपरने भारताविरुद्ध कसोटी डेब्यू करत 100वा सामना खेळला होता तर कपिल देव यांनी पाकिस्तानमध्ये कसोटी पदार्पण करत तिथेच 100वा सामना देखील खेळला होता.
दरम्यान, चेन्नई येथील पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन झटके बसल्यावर रूटने कॅप्टन्सी इंनिंग खेळली आणि सलामी फलंदाज डोम सिब्लीच्या साथीने संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. रूट आणि सिब्लीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. आणि आता दोन्ही फलंदाजांवर मोठी धावसंख्या करण्याची जबाबदारी आहे.