IND vs ENG 1st Test 2021: भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) खुलासा केला आहे की त्याने इंग्लंड (England) मधील आव्हानात्मक परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी त्याच्या फलंदाजीमध्ये काही तांत्रिक बदल केले आहेत. यामध्ये क्रीज वापरणे आणि चेंडू आपल्या शरीराच्या जवळ खेळण्याचा समावेश आहे. इंग्लंड आणि भारत (India) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलसह (KL Rahul) रोहितने संघाला चांगली सुरुवात करून देत 36 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित म्हणाला, “हो, तुम्हाला काही बदल करावे लागतील आणि मी देखील केले आहेत. सलामीवीर म्हणून जेव्हा बॉल स्विंग होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते. या परिस्थितीत खेळणे कधीही सोपे नसते, परंतु तुम्हाला माहित आहे की तुम्ही नेहमी एक फलंदाज म्हणून स्वतःला आव्हान देता, मी तेच करण्याचा प्रयत्न करीत आहे.” (IND vs ENG: टीम इंडिया खेळाडूंवर राहिला जेम्स अँडरसनचा दबदबा, ‘या’ दिग्गजांना दाखवलाय सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता)
रोहित पुढे म्हणाला, “मी माझ्या तंत्रातही काही बदल केले आहेत. मी क्रीजमध्ये जास्त हालचाल न करण्याचा प्रयत्न करत आहे, बॅट शरीराच्या जवळ ठेवताना शक्य तितके स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मी ज्याप्रकारे नवीन चेंडूने खेळलो आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. अशा परिस्थितींमध्ये तुम्ही कधीही सेट होत नाही. आपल्याला फक्त प्रत्येक चेंडूला नवीन चेंडू मानावे लागते. म्हणून तुम्हाला फक्त स्वतःला हे पटवून द्यावे लागेल की प्रत्येक चेंडू वेगळा आहे आणि तुम्ही फक्त हे सुनिश्चित केले पाहिजे की जोपर्यंत तुम्ही क्रीजवर आहात तोपर्यंत तुम्ही असेच विचार करत रहा.” दरम्यान, टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 183 धावांवर ऑल आऊट झाला.
अनुभवी इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (2/15) ने त्याच्या गोलंदाजीची जादू कायम ठेव दुसऱ्या दिवशी भारताला 125/4 धावसंख्येवर रोखले. तसेच संघाच्या मधल्या फळीच्या खराब कामगिरीमुळे रोहित त्रस्त दिसला नाही. यजमान संघाच्या चांगली गोलंदाजीमुळे टीम इंडियाची मधली फळी पहिल्या डावात गडगडली असे रोहितने म्हटले. रोहित-राहुलच्या 97 धावांच्या सलामी भागीदारीनंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली व अजिंक्य रहाणेची लागोपाठ विकेटचा फटका संघाला बसला.