टीम इंडिया (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून बांग्लादेशी कर्णधार महमुदुल्लाह याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी तो निर्णय योग्य देखील ठरवला. टॉस गमावल्यावर पहिले फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा शफीउल इस्लाम याच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. याच्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने के एल राहुल याच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केले. दोंघांनी चौकार मारत संघाचा स्कोर पुढे नेला. हा सामना मालिकेचा निर्णय आहे, कारण या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील एक-एक सामने दोन्ही संघाने जिंकले आहेत. (Shikhar Dhawan च्या अंगात जेव्हा Akshay Kumar शिरतो; पाहा काय घडतं त्यानंतर)
धवन 19 धावांवर बाद झाला. 19 धावांच्या डावांत धवनने टी-20 क्रिकेटमध्ये आपली धावसंख्या 1500 पेक्षा जास्त नोंदवली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1500 धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. भारतासाठी धवनच्या आधी रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी याआधी हा टप्पा गाठला आहे. आता या खेळाडूंच्या यादीत धवनचाही समावेश झाला आहे. धवन हा एक चांगला टी-20 फलंदाज आहे पण, बांग्लादेशविरुद्ध मालिकेत त्याला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने धावा करण्याचा प्रयत्न केला, पण मोठा डाव खेळण्यात त्याला यश आले नाही. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात धवनने अत्यंत हळू डाव खेळला आणि 41 धावा फटकावल्या, तर राजकोटमधील दुसर्या सामन्यात रोहितबरोबर शतकी भागीदारी केली, पण त्याला केवळ 31 धावा करता आल्या.
आजच्या सामन्यात त्याने आपल्या छोट्या खेळीत चांगले फटके मारले पण त्याने आपला डाव मोठ्या धावसंख्येत बदलता आला नाही. धवनने शफिउलच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू जास्त लांब गेला नाही आणि बांग्लादेशचा कर्णधार महमूदुल्लाह याने काही चूक न करता शानदार झेल पकडला.