IND vs BAN 1st Test: विराट कोहली याने एम एस धोनी याचा 'हा' रेकॉर्ड काढला मोडीत, बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात बनले 'हे' प्रमुख विक्रम
एम एस धोनी, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपदाचा एका महत्तवपूर्ण रेकॉर्डची नोंद करत विराट कोहली (Virat Kohli) याने माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला मागे टाकले आहे. कोहलीने सर्वाधिक टेस्ट सामने डाव आणि धावांच्या फरकाने जिंकण्याच्या दृष्टीने धोनीचा विक्रम मोडला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने (India) दहावा कसोटी सामना डाव आणि धावांनी जिंकला. इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा पराभव केला. भारताने बांग्लादेशचा (Bangladesh) डाव आणि 130 धावांनी पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. बांग्लादेशची टीम फक्त तीन दिवसांत भारतीय गोलंदाजांसमोर गारद झाली. पहिल्या डावात 150 धावांवर बाद झाल्यानंतर टीम दुसऱ्या डावात 213 धावत करू शकला. दुसरीकडे, भारताने पहिल्या डावात 493 धावा केल्या होत्या. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दहाव्या वेळी डाव आणि धावांच्या फरकाने टेस्ट सामना जिंकला आहे. भारतीय संघासाठी हा एक मोठा विक्रम आहे, कारण यापूर्वी धोनीने टीम इंडियाकडे सर्वाधिक 9 वेळा डाव आणि धावांनी सामना जिंकण्याच्या विक्रमची नोंद केली होती. (IND vs BAN 1st Test: भारतीय वेगवान गोलंदाजांची प्रभावी खेळी, बांग्लादेशविरुद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवत घेतली 1-0 अशी आघाडी)

इतकेच नाही, तर कोहलीने सलग तीन कसोटी सामने डाव आणि धावांनी जिंकून भारतीय संघासाठी एक अनोखा विक्रम नोंदविला आहे. दरम्यान, फक्त विराटच नाही, तर अन्य भारतीय खेळाडूंनीही पहिल्या सामन्यात काही प्रमुख विक्रमांची नोंद केली आहे. जाणून घ्या:

1. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या डावात विकेट घेत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या क्लबमध्ये शामिल झाला आहे. कर्णधार मोमीनुल हक याला बाद करत घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक 250 विकेट घेणारा अश्विन तिसरा गोलंदाज बनला आहे. कुंबळेने भारतीय भूमीवर खेळताना 350 विकेट्स घेतल्या आहेत, तर हरभजन सिंह याने एकूण 265 विकेट घेतले आहेत. इतकेच नव्हे तर घरी सर्वाधिक जलद 250 टेस्ट विकेट घेणारा अश्विनने 62 सामन्यासह मुरलीधरनची बरोबरी केली आहे.

2. मयंक अग्रवाल याने बांग्लादेशविरुद्ध पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. मयंकने आपल्या कारकिर्दीतील तिसरे शतक फक्त 12 डावात केले. या विक्रमासह त्याने अनुभवी फलंदाज विजय मर्चंट यांची बरोबरी केली. मयंक आणि मर्चंटने सलामी फलंदाज म्हणून तिसरे शतक फक्त 12 डावात केले. शिवाय, मयंकने ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या 13 डावांमध्ये दुसरे दुहेरी शतकी खेळीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

3. बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या दिवशी फलंदाजी करतटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने 4,000 टेस्ट धावा पूर्ण केल्या. टेस्टमध्ये सर्वात जलद 4000 धावा पूर्ण करत रहाणेने माजी कर्णधार कपिल देव, दिलीप वेंगसरकर आणि सध्याचा विकेटकीपर-फलंदाज महेंद्र सिंह धोनी यांना मागे टाकले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चार हजार धावा करणारा रहाणे 16 भारतीय फलंदाज आहे. रहाणेने 104 डावात, तर वेंगसरकर, कपिल आणि धोनीने अनुक्रमे 114, 138 आणि 116 डावर ही कामगिरी केली आहे.

4. एका मोसमात टेस्ट क्रिकेटमध्ये दुसरे दुहेरी शतक झळकावणारा मयंक दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. यापूर्वी 1955/56 मोसमात माजी सलामी फलंदाज विजय हजारे यांनी ही कामगिरी केली होती.

5. मयंकने 243 धावांच्या खेळी 8 षटकार ठोकले. यासह मयंक संयुक्तपणे नवजोत सिंह सिद्धूयांच्यासह पहिल्या स्थानावर पोहचला आहे. सिद्धूने 1994 लखनौमध्ये श्रीलंकाविरुद्ध टेस्ट सामन्यात 8 षटकार मारले होते.

6. मयंकने केलेल्या 243 धावा भारतीय फलंदाजाने केलेल्या पाचव्या सर्वाधिक धावा आहेत. 254 धावांसह कर्णधार विराट चौथ्या स्थानावर आहे.

7. बांग्लादेशला पराभूत करत सर्वाधिक कसोटी सामने जिंकणार्‍या कर्णधारांच्या यादीत कोहली संयुक्तपणे पाचव्या स्थानावर पोहचला आहे. आणि ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border) यांची बरोबरीची त्याने केली. कोहली आणि बॉर्डरने एकूण 32 टेस्ट सामन्यात कर्णधार म्हणून विजय मिळवला आहे. कोहलीने 58 सामन्यात 32, तर बॉर्डरने 91 सामन्यात तितकेच मॅचेस जिंकावल्या होत्या.

8. आजवर खेळल्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया कोणताही संघ आव्हान देऊ शकला नाही. घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग 7 वा विजय होता. भारतात खेळताना भारताने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.

भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्ध पहिल्या दिवसापासून वर्चस्व राखले आणि डाव आणि 130 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आजवर एकूण सहा सामने खेळत सर्व सामने जिंकले आहेत. आणि सध्या त्यांचे एकूण 300 गुण आहेत. यापूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन आणि नंतर दक्षिण आफ्रिकाविरूद्ध तीन कसोटी सामने जिंकले होते.