भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहली याच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणार्या टीम इंडियाचा 'हिटमन' रोहित शर्मा याने कोहलीला पछाडत पुन्हा एकदा विश्वविक्रमाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात 8 धावा केल्यावर रोहित पुन्हा एकदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या सामन्याआधी रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 90 डावांमध्ये 2443 धावा, कोहलीच्या 7 धावा मागे होता. अशा परिस्थितीत आजच्या मॅचमध्ये रोहितने कोहलीच्या 67 डावांमध्ये 2450 धावा मागे टाकून सर्वोच्च स्थान गाठले आहे. पण, रोहित ही कामगिरी करत त्वरित बाद झाला. शैफुल इस्लाम याने 9 धावांवर रोहितला माघारी धाडले. दरम्यान, या मालिकेत रोहितकडे विराटविरुद्ध चांगली आघाडी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. (IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याने टीम इंडियासाठी केली 'या' विक्रमाची नोंद, एम एस धोनी ही राहिला मागे)
विराटने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेदरम्यान रोहितचा रेकॉर्ड मोडत पहिले स्थान मिळवले होते. आणि आता विराटला पछाडत रोहितने पुन्हा एकदा जुन्या विक्रमाची नोंद केली आहे. इतकेच नव्हे तर बांगलादेशविरुद्धच्या टी -20 सामन्यात रोहितनेटीम इंडियाचा कॅप्टन कूल म्हटलेल्या महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यालाही मागे टाकले आहे. धोनीने आजवर 98आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत रोहितचा आज बांग्लादेशविरुद्ध 99 वा सामना आहे. आणि या सामन्यासाठी मैदानात प्रवेश करताच रोहित भारतासाठी सर्वाधिकआंतरराष्ट्रीय टी-20 खेळणारा नंबर एकचा फलंदाज ठरला.
दुसरीकडे, आजचा हा 1000 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. पहिला टी-20 सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात फेब्रुवारी 2005 मध्ये खेळला गेला होता. अष्टपैलू शिवम दुबे याने भारताकडून तर बांगलादेशकडून मोहम्मद नईम याने टी-20 मध्ये पदार्पण केले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 8 टी -20 सामने झाले आहेत, ज्यात आतापर्यंत टीम इंडियाने विजय मिळवला आहे.