IND vs AUS Test 2021: भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळल्या जाणार्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेचा चौथा सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 54 धावांची आघाडी घेत 21 धावा केल्या. टीमकडे 10 विकेट्स शिल्लक असल्याने चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेत टीम इंडियावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. यासह, टीम इंडियाने (Team India) 2003-2004 ऑस्ट्रेलिया दौर्याच्या आठवणी उजागर झाल्या जेव्हा टीम पहिल्या डावात 33 धावांनी मागे असतानाही अॅडलेडचं (Adelaide) मैदान मारण्यात यशस्वी ठरली होती. या दौर्यावर दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. मालिकेचा पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला गेला जो अनिर्णीत राहिला होता. अॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने रिकी पॉन्टिंगच्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 556 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात टीम इंडियानेही पहिल्या डावात राहुल द्रविड आणि व्हीव्हीस लक्ष्मणच्या शतकी खेळीच्या जोरावर 523 धावांपर्यंत मजल मारली, मात्र धावा कमी 33 पडल्या. (IND vs AUS 4th Test Day 4 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी ब्रिस्बेन टेस्ट लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)
दुसऱ्या डावात अजित आगरकरच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांने कांगारू संघाचा डाव 196 धावांवर संपुष्टात आणला ज्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य मिळाले. राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर संघाने सहा गडी गमावून हे लक्ष्य गाठले. द्रविडला त्याच्या सर्वोत्कृष्ट दुहेरी शतकासाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचे जगभरात कौतुक झाले, कारण पहिल्या डावात पिछाडीवर असूनही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला आपल्या घरीच धूळ चारली. तथापि, या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये खेळला गेलेला मालिकेचा तिसरा सामना 9 विकेट्सने जिंकला. सिडनी येथे खेळलेला शेवटचा सामना अनिर्णित राहिला आणि त्यामुळे दोन टीममधील चार सामन्यांची मालिका अनिर्णीत राहिली.
अशा स्थितीत, जेव्हा अॅडिलेडमध्ये पहिल्या डावानंतर 33 धावांनी पिछाडीवर असूनही टीम इंडियाने सामना जिंकला होता. त्यामुळे, पुन्हा एकदा हा चमत्कार करून भारतीय संघ सामना जिंकणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.