रविवारी (9 जून) आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात भारत विजयी ठरला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पा (Adam Zampa) याच्या मैदानातील कृतीवर नेटकऱ्यांकडून संशय व्यक्त करण्यात आला. अॅडम बॉल टेम्परिंग (Ball Tampering) करत असल्याचा संशय व्यक्त करत नेटकऱ्यांनी काही फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे आस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा चर्चेत आला. या सर्व प्रकरणावर कर्णधार अॅरोन फिंच याने स्पष्टीकरण दिले आहे. (IND vs AUS CWC 2019 सामन्यादरम्यान ट्विटर युजर्सचा अॅडम झॅम्पा याच्यावर Ball Tampering चा संशय)
फिंच म्हणाला की, "मी व्हायरल झालेले फोटोज, व्हिडिओज पाहिलेले नाहीत. पण झम्पा हात गरम करण्यासाठी खिशात घालत होता. तो स्वत:कडे हॅन्डवॉर्मर ठेवतो. तसंच मी फोटोज पाहिलेले नसल्यामुळे मी याबद्दल फार काही बोलू शकत नाही. पण प्रत्येक सामन्यावेळी झम्पाकडे हॅन्डवॉर्मर असतो हे नक्की."
तसंच या प्रकरणावर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने देखील अॅडम झॅम्पाची बाजू घेतली आहे. पीटरसन म्हणाला की, "इंग्लंडमध्ये थंडी असल्यामुळे प्रत्येक खेळाडू हात गरम करण्यासाठी स्वत:कडे हॅन्डवॉर्मर ठेवतो. तर फिल्डींगच्या वेळी प्रत्येक खेळाडू संपूर्ण वेळ हात खिशात घालून ठेवतो. झॅम्पाही तसेच करत होता. त्यात काही नवीन नाही."
Kevin Pietersen ट्विट:
Almost EVERYBODY uses hand warmers when it’s cold here in England when fielding.
Hands in pockets the WHOLE time!
Zamps was just being dozy!
NOTHING IN IT!
— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 10, 2019
यापूर्वी बॉल टेपरिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वार्नर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली होती.