IND vs AUS 4th Test Day 2: ब्रिस्बेन कसोटी (Brisbane Test) सामन्यात दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन (Australia) गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि भारताच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत कांगारू संघ पहिल्या डावात 369 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, चहापानापर्यंत टीम इंडियाने (Team India) 2 विकेट गमावून 62 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे भारतीय संघ (Indian Team) कांगारू संघाच्या पहिल्या डावात 307 धावांनी पिछाडीवर आहेत. चेतेश्वर पुजारा नाबाद 8 धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 2 धावा करून खेळत आहेत. गोलंदाजी करत यजमान संघाला पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवून दिली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्समध्ये 274 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि पहिल्या सत्राखेर संपूर्ण संघ त्रिशतकी धावसंख्येवर बाद होऊन माघारी परतला. (IND vs AUS 4th Test 2021: टी नटराजन, वॉशिंग्टनचे 'सुंदर' डेब्यू! 72 वर्षानंतर भारतीय गोलंदाजांनी टेस्ट पदार्पणात केली कमाल)
पहिला सामना खेळत वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूरने देखील आक्रमक गोलंदाजी करत संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं. शार्दूलने देखील 3 कांगारू फलंदाजांना माघारी धाडलं. यजमान संघाचा पहिला डाव संपुष्टात येताच भारताने दुपारच्या जेवणांनंतर फलंदाजीस सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला आली, मात्र संघाला प्रभावी सुरुवात करून देण्यात अपयशी ठरली. कमिन्सने गिलला विकेटच्या मागे अवघ्या 7 धावांवर झेलबाद केलं. यानंतर रोहितने काही चौकार लगावत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, 100वा कसोटी सामना खेळणाऱ्या लायनच्या फिरकीत भारतीय ओपनर अडकला आणि 44 धावांवर मिचेल स्टार्ककडे कॅच आऊट झाला.
दुसरीकडे, यजमान संघासाठी मार्नस लाबूशेन 108 धावांची शतकी खेळी करून, तर स्टिव्ह स्मिथ 36 आणि मॅथ्यू वेड 45 धावा करून माघारी परतले. कॅमरून ग्रीन आणि कर्णधार टीम पेन यांनीही चांगली बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीनशे पार नेली. पेनने 50 धावा तर ग्रीनने 47 धावा केल्या. शेवटच्या तीन फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. तळाच्या मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जॉस हेजलवूड यांनी मिळून 55 धावा केल्या.