IND vs AUS 4th Test 2021: टी नटराजन, वॉशिंग्टनचे 'सुंदर' डेब्यू! 72 वर्षानंतर भारतीय गोलंदाजांनी टेस्ट पदार्पणात केली कमाल
वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test 2021: यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) सामन्यात टीम इंडियासाठी (Team India) कसोटी पदार्पण करणाऱ्या टी नटराजन (T Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी पहिल्या डावात कमालच केली. दोघांनी मिळून 6 कांगारू फलंदाजांना माघारी धाडलं. सुंदर आणि नटराजनच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर संपुष्टात आणला. नटराजनने 78 धावा देत तीन आणि वॉशिंग्टन सुंदरने 89 धावांवर तीन गडी बाद केले. यासह, या जोडीने 72 वर्षानंतर एक मोठा विक्रमाची पुनरावृत्ती केली. नटराजन आणि सुंदर एकाच कसोटी डावात तीन गडी बाद करणाऱ्या क्लबमध्ये सामील झाले. बर्‍याच वर्षानंतरच असे घडले जेव्हा भारताकडून दोन नवख्या गोलंदाजांनी एकाच कसोटी डावात तीन विकेटच्या क्लबमध्ये प्रवेश केला. सुंदरला रविचंद्रन अश्विन तर नटराजनला जसप्रीत बुमराहच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अश्विन आणि बुमराहला सिडनी कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली ज्यामुळे त्यांना गब्बा टेस्ट सामन्यातून माघार घ्यावी लागली. (IND vs AUS 4th Test Day 2: ब्रिस्बेन टेस्टमध्ये नटराजन, शार्दूल ठाकूर आणि सुंदरने दाखवला दम; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला)

नटराजन आणि सुंदर यांच्यापूर्वी 1948-1949 मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडीजविरुद्ध भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मंटू बॅनर्जी आणि गुलाम अहमद पहिल्या डावात 3 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. नटराजनने मॅथ्यू वेड, मार्नस लाबूशेन आणि जोश हेझलवूड यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवलं तर वॉशिंग्टन सुंदरने स्टिव्ह स्मिथ, कॅमरुन ग्रीन आणि नाथन यांना माघारी धाडलं. नटराजन आणि सुंदरला वगळता शार्दूल ठाकूरने देखील 3 गडी बाद केले. वेस्ट इंडिजविरुद्ध 2018 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील सामन्यातून पदार्पण करणाऱ्या शार्दूलचा कांगारू फलंदाज पहिला कसोटी शिकार ठरला. शार्दूलने पहिल्या दिवसाच्या पहिलीच ओव्हरमध्ये वॉर्नरला बाद करत माघारी धाडलं आणि पहिली टेस्ट विकेट घेतली. दरम्यान, कांगारू संघाचा पहिला डाव 115.2 ओव्हरमध्ये 369 धावांवर संपुष्टात आला. मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी केली. कर्णधार टिम पेन 50 आणि कॅमरुन ग्रीन 47 धावा करून परतले.

दुसरीकडे, लक्षात घेण्यासारखे म्हणजे नटराजनने यापूर्वी कांगारू दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मधेही डेब्यू केले. एकाच दौऱ्यावर तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा नटराजन पहिलाच भारतीय क्रिकेटर ठरला. विशेष म्हणजे नटराजनचा मूळ भारतीय संघात समावेश झाला नसून त्याला नेट गोलंदाज म्हणून दौऱ्यावर नेले होते मात्र खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याच्याकडे संधी चालून आली.