टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 4th Test Day 2: ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) येथे भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australira) संघातील चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शार्दूल ठाकूर (Shardul Thakur), टी नटराजनचा (T Natarajan) वेगवान हल्ला आणि वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीच्या जोरावर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि कांगारू संघाला पहिल्या डावात 115.2 ओव्हरमध्ये 369 धावांवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियन संघाने सलग दुसऱ्यांदा मालिकेत त्रिशतकी मजल मारली. पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी केली. कर्णधार टिम पेन 50 आणि कॅमरुन ग्रीन 47 धावा करून परतले. मॅथ्यू वेडने 45 आणि स्टिव्ह स्मिथने 36 धावा केल्या. आपला 100वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनने 22 चेंडूत 24 धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून शार्दूल ठाकूरने कसून गोलंदाजी केली. शार्दूल, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराजने एक गडी बाद केला. (IND vs AUS 4th Test 2021: रोहित शर्मा नॉन-स्टॉप! गब्बा टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी जबरदस्त कॅच पकडत टिम पेनला धाडलं माघारी Watch Video)

दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 274 धावांवर खेळण्यास सुरवात केली. दुसर्‍या दिवशी कर्णधार टीम पेनने युवा कॅमेरून ग्रीनसह माफक सुरुवात केली. दोघांनी धावसंख्या तीनशे पार नेली. या दरम्यान, पेनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 9वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 102 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले मात्र, अर्धशतक पूर्ण करताच पेनला शार्दूल ठाकूरने माघारी धाडलं. पुढील ओव्हरमध्ये सुंदरने 47 धावांवर खेळणाऱ्या ग्रीनला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. शार्दुलने कमिन्सला एलबीडब्ल्यू केले आणि ऑस्ट्रेलियाचा आठवा धक्का दिला. यानंतर, लायनला 24 धावांवर क्लीन बोल्ड करत सुंदरने तिसरी विकेट घेतली.

यापूर्वी पहिल्या दिवशी लाबूशेनने संघासाठी एकमेव शतकी डाव खेळला. लाबूशेन आणि कर्णधार पेनला वगळता अन्य फलंदाज पन्नाशी पार करू शकले नाही. गब्बा येथे भारताकडून टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी कसोटी पदार्पण केलं. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करत मार्कस हॅरिसचा समावेश केला आणि दुखापतग्रस्त विल पुकोवस्कीला बाहेर केलं.