IND vs AUS 4th Test Day 1: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) संघातील ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. गब्बा येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारू संघाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे मात्र, त्यांनी 87 ओव्हरमध्ये द्विशतकी धावसंख्या गाठली असून दिवसाखेर 274 धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध करत सर्वाधिक 108 धावा केल्या. मॅथ्यू वेडने (Matthew Wade) 45 तर स्टिव्ह स्मिथने 36 धावांचे योगदान दिले. एकाबाजूने भारतीय गोलंदाज वर्चस्व गाजवत असताना लाबूशेनने एक बाजू धरून ठेवली आणि शतकी खेळी केली. यापूर्वी झालेल्या पहिल्या तीनही सामन्यात कांगारू संघाचा नंबर 3 फलंदाज तिहेरी धावसंख्या गाठण्यासाठी झगडत होते. लाबूशेनने तिसऱ्या सिडनी टेस्टमध्ये 91 आणि 73 धावांची खेळी केली होती. भारताकडून ब्रिस्बेनमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने (T Natarajan) दिवसाखेर 2 तर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 4th Test 2021: पृथ्वी शॉ याची एक चूक टीम इंडियाला महागात पडली असती, रोहित शर्मा थोडक्यात बचावला, तुम्हीच पहा Video)
टॉस जिंकूनऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरच्या अंतिम चेंडूवर सिराजने डेविड वॉर्नर आणि 9व्या ओव्हरमध्ये शार्दूलने मार्कस हॅरिसला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. वॉर्नर 1 आणि हॅरिस 5 धावच करू शकला. यानंतर लाबूशेन-स्मिथच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अखेर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या स्मिथला सुदंरने बाद करत संघाला मोठा दिलासा दिला. स्मिथ वॉशिंग्टन सुंदरचा पहिला कसोटी शिकार ठरला. त्यानंतर, लाबूशेन आणि वेडच्या शतकी भागीदारीने संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. या दरम्यान, संघ बॅटफुटवर असताना सावध खेळ करत लाबूशेनने 5वे कसोटी शतक ठोकले. लाबूशेन-वेडमध्ये चौथ्या विकेटसाठी 113 धावांची मजबूत भागीदारी झाली. लाबूशेन धोकादायक ठरत असताना पदार्पणवीर नटराजनने कसोटीतील पहिली विकेट घेतली आणि वेडला 45 धावांवर शार्दूल ठाकूरच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर नटराजनने शतकवीर लाबूशेनला माघारी धाडलं. लाबुशेनने 204 चेंडूत 9 चौकारांसह 108 धावांची खेळी केली.
दरम्यान, ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर दिवसाचा खेळ संपला तेव्हा अष्टपैलू कॅमरुन ग्रीन नाबाद 28 धावा आणीन कर्णधार टिम पेन नाबाद 38 धावा करून खेळत होते. आता दुसऱ्या दिवशी या दोन्ही खेळाडूंवर संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी असणार आहे. ग्रीन आणि पेनच्या जोडीत सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दुसरीकडे, भारताचा अननुभवी गोलंदाजी विभागावर त्यांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे आव्हान असेल.