IND vs AUS 4th Test 2021: टिम पेनचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, गब्बा टेस्टसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले महत्त्वपूर्ण बदल
टिम पेन आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील चौथ्या आणि अंतिम बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी सामना आजपासून ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी कांगारू संघाचा कर्णधार टिम पेनने (Tim Paine) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने मॅचच्या एक दिवसापूर्वी प्लेइंग इलेव्हन जाहीर केला होता ज्यात एक बदल करण्यात आला होता. दुखापतग्रस्त विल पुकोवस्कीला बाहेर केले असून त्याच्या जागी मार्कस हॅरिसचा (Marcus Harris) समावेश झाला आहे. हॅरिस आता डेविड वॉर्नरसह ऑस्ट्रेलिया संघाकडून सलामीला येईल. कांगारू संघात अन्य कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, दुखापतींमुळे टीम इंडियाने सुरुवातीला प्लेइंग इलेव्हन जाहीर करणे टाळले. मात्र, टॉस दरम्यान अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सांगितले की संघात काही बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळाडूंना होणाऱ्या दुखापतीने टीम इंडिया त्रस्त आहे. आजवर तब्बल 9 खेळाडूंनी जखमी होत माघार घेतली आहे. (IND vs AUS 4th Test Day 1 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी ब्रिस्बेन टेस्ट लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)

टीम इंडियाकडून टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.भारतीय प्लेइंग इलेव्हननुसार रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला येईल, तर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर चेतेश्वर पुजारा आणि आजीनी रहाणे कायम आहेत. हनुमा विहारीच्या जागी मयंक अग्रवाल पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. रिषभ पंतचे सहावे स्थान कायम आहे, तर रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. मोहम्मद सिराज व नवदीप सैनी संघात कायम आहेत आर अश्विनच्या जागी नटराजनचा तर जसप्रीत बुमराहच्या जागी शार्दूल ठाकूरला सामील केले आहेत. बुमराहच्या ओटीपोटात ताण असल्याचे वृत्त तिसऱ्या सिडनी टेस्टनंतर समोर आले होते ज्यामुळे त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला होता. पण फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर म्हणाले, "जर तो खेळू शकला, तर तो खेळेल."

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.