रोहित शर्माने कॅच घेत डेविड वॉर्नरला धाडलं तंबूत (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) मैदानावर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय (India) संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेच्या चौथ्या व अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. सामन्यात कांगारू सांगाच कर्णधार टिम पेनने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने गब्बा कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून टीम इंडिया इलेव्हनमध्ये चार बदल पाहायला मिळाले. कांगारू संघासाठी सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणाऱ्या विल पुकोवस्कीला दुखापतीमुळे बाहेर केले असून त्याच्या जागी मार्कस हॅरिसचा समावेश झाला आहे. हॅरिसने ज्येष्ठ ओपनर डेविड वॉर्नर (David Warner) याच्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली, पण दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) यजमान संघाला मोठा झटका दिला. (IND vs AUS 4th Test 2021: टिम पेनचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, गब्बा टेस्टसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले महत्त्वपूर्ण बदल)

सिराज भारताकडून पहिली ओव्हर टाकत होता आणि अंतिम चेंडूवर त्याने वॉर्नरला तंबुत पाठवलं. ओव्हरचा अंतिम चेंडू वॉर्नरच्या बॅटच्या कडेला लागून विकेटच्या मागे पहिल्या स्लिपमध्ये जात होता. टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा दुसऱ्या स्लिपमध्ये उभा होता, जेव्हा त्याने डाइव्ह मारून अगदी जबरदस्त कॅच घेतला ज्यामुळे वॉर्नरचा डाव सुरु होताच संपुष्टात आला.रोहितने डाइव्ह मारली नसती नसती तर चेंडूने पहिल्या स्लिपवर असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या पुढे टप्पा खाल्ला असता आणि वॉर्नरला जीवदान मिळाले असते. वॉर्नर 1 धाव करून माघारी परतला. वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे वॉर्नरला संपूर्ण टी-20 आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. सिडनी टेस्ट सामन्यातून वॉर्नरने कमबॅक केलं, पण दोन्ही डावात तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पहा व्हिडिओ:

शुक्रवारपासून सुरु झालेल्या ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापग्रस्त जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. टी नटराजन आणि वॉशिंगटन सुंदर यांचं कसोटी पदार्पण झालं आहे. शिवाय, मयंक अग्रवाल आणि मुंबईकर शार्दुल ठाकूरलाही संधी देण्यात आली आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाने 1988 नंतर एकही कसोटी सामना गमावलेला नाही, त्यामुळे सामन्यासह मालिका जिंकण्याच्याही त्यांच्या आशा नक्कीच उंचावल्या असतील. दुसरीकडे, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी कांगारू संघाला अंतिम सामने जिंकणे गरजेचे आहे, मात्र भारताला ट्रॉफी आपल्याकडे राखण्यासाठी ही लढत अनिर्णीत राखणेसुद्धा पुरेसे ठरेल.