IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) संघात चौथ्या ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत कांगारू संघाच्या 6 फलंदाजांना माघारी धाडलं असलं तरी यजमान संघाची आघाडी दुसऱ्या डावात 250 पार पोहचली आहे. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीजचा अंतिम सामना खेळला जात आहे. कांगारू संघाविरुद्ध पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही रोहित शर्माने (Rohit Sharma) स्लिपमध्ये गोलंदाजांना चांगली साथ दिली आणि एका अनोख्या पराक्रमाची नोंद केली. रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये एका सामन्यात नॉन-विकेटकीपर फील्डरने घेतलेल्या सर्वाधिक कॅचेसच्या रेकॉर्डची नोंद केली. रोहितने गब्बा (Gabba) येथील चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आजवर सर्वाधिक 5 झेल पकडले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये नॉन विकेटकीपर फिल्डरने 5 झेल पकडण्याची ही फक्त दुसरीच वेळ आहे. यापूर्वी, 1992 पर्थ टेस्टमध्ये क्रिस श्रीकांत (Kris Srikkanth) यांनी 5 कॅच पकडले होते. (IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्मा याच्याकडून स्टिव्ह स्मिथच्या डर्टी गेमची पुनरावृत्ती? पहा Video)
रोहितने ब्रिस्बेनच्या पहिल्या डावात कांगारू संघाच्या डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि कर्णधार टिम पेन यांचा दमदार कॅच पकडला होता. तर दुसऱ्या डावात त्याने मार्नस लाबूशेन आणि कॅमरुन ग्रीन यांना झेलबाद करत माघारी धाडलं. अशाप्रकारे रोहितने एका कसोटी सामन्यात 5 कॅच पकडण्याच्या पराक्रमाची नोंद केली. दरम्यान, रोहितने आपल्या फिल्डिंगसह बॅटिंगने देखील पहिल्या डावात संघासाठी चांगली कामगिरी बजावली होती. रोहितने 44 धावा करत संघाला आश्वासक सुरुवात केली होती, मात्र चुकीचा फटका मारत मिचेल स्टार्ककडे झेलबाद होऊन माघारी परतला आणि त्याचे अर्धशतक काही धावांनी हुकले. रोहित यापूर्वी पहिल्या डावात धावा करण्यात अपयशी ठरला होता.
दुसरीकडे, कांगारू संघ गब्बा येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करत मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. स्टिव्ह स्मिथ 55 आणि डेविड वॉर्नरने 48 धावा केल्या. कॅमरुन ग्रीनने 37 तर कर्णधार टिम पेनने 27 धावांचे योगदान दिले. हा लेख लिहीपर्यंत यजमान संघाचे 7 फलंदाज तंबूत परतले असून टीम इंडियावर 276 धावांची आघाडी घेतली आहे.