मोहम्मद सिराजने केली वर्णद्वेषी टिप्पणीची तक्रार (Photo Credit: Instagram, Twitter)

IND vs AUS 3rd Test Day 4: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी कसोटी (Sydney Test)मालिकेत एक मोठा वाद समोर आला आहे. टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूना उद्देशून सिडनीच्या मैदानात (SCG) तिसऱ्या दिवशी वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आल्याची टीम मॅनेजमेंटनं गंभीर दखल घेतली असून मॅच रेफ्रीकडे तक्रार केली आहे. सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता चौथ्या दिवशीही असेच लज्जास्पद चित्र पहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना ही घटना घडली ज्यानंतर त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेला  (Ajinkya Rahane) माहिती दिली आणि दोघांनी मैदानावरील अंपायर पॉल रेफेल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनतर प्रेक्षक स्टॅन्डमधील पोलिसांना याची माहिती देण्यात आली ज्यांनी कारवाई केली आणि टिप्पणी करणाऱ्या सहा जणांना स्टेडियमच्या बाहेरचा रास्ता दाखवला. (IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, तिसऱ्या कसोटी टीम इंडियापुढे डोंगराएवढं 407 धावांचे लक्ष्य)

सिराजच्या तक्रारीनंतर चहाच्या वेळेपूर्वी काही वेळ खेळ थांबवण्यात आला. पाच मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर अंपायर, सुरक्षा आणि पोलिसांनी कथित गुन्हेगार ओळखले आणि त्यांना त्यांच्या जागेवरून हलवण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नंतर सहा जणांना मैदानातून बाहेर काढले असल्याची पुष्टी केली. सिराजला संताप अनावर होत होता मात्र, कर्णधार रहाणे आणि रोहित शर्माने त्याचे सांत्वन केले. सिराजने स्टँडकडे देखील लक्ष वेधून देताना दिसला जिथून काही प्रेक्षकांनी गैरवर्तन केले होते. त्यावेळी क्रीजवर असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने रहाणेशी या विषयावर चर्चा केली. या घटनेमुळे खेळ 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबवण्यात आला. मात्र, यंदा चाहत्यांना फक्त चेतावणी देऊन सोडले गेले नाही, तर त्याऐवजी मैदानाबाहेर काढले गेले. SCG मधील अन्य प्रेक्षकांनी या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

यापूर्वी, सिडनी क्रिकेट मैदानावर तिसर्‍या दिवशी वेगवान गोलंदाज सिराज याच्यावर काही समर्थकांनी टिप्पणी केल्यावर यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती. काही मद्यधुंद समर्थकांनी सिराजवर 'गंभीरपणे अपमानजनक' अशी टीका करून वांशिक टिप्पणी केली. कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासह ज्येष्ठ खेळाडूंच्या लक्षात आल्यानंतर या घटनेची नोंद करण्यात आली आणि त्यांनी हे मैदानावरील अंपायरांना याची माहिती दिली.