IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, तिसऱ्या कसोटी टीम इंडियापुढे डोंगराएवढं 407 धावांचे लक्ष्य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्ट (Sydney Test) सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने 6 बाद 312 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि टीम इंडियापुढे (Team India) विजयासाठी 407 धावांचे आव्हान ठेवले. दुसऱ्या डावात कांगारू संघासाठी मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne, स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि कॅमरुन ग्रीन (Cameron Green) अशा तीन खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केली व संघाला त्रिशतकी धावसंख्या पार करून दिली. कांगारू संघाने पहिल्या डावात 94 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही खेळाडूंच्या गचाळ फिल्डिंगचा फटका टीम इंडियाला बसला. स्मिथ, ग्रीन आणि लाबुशेन यांचे सोपे झेल भारतीय खेळाडूंना पकडता आले परिणामी या तीनही खेळाडूंनी मोठी खेळी साकारली. ग्रीनने सर्वाधिक 84 तर स्मिथने 81 धावा आणि लाबूशेनने 73 धावांचा डाव खेळला. दुसरीकडे, नवदीप सैनी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 2 तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्टमध्ये मोहम्मद सिराज याला वर्षद्वेश भोवला, तक्रारीनंतर पोलिसांनी केली कारवाई)

यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करत स्टिव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर 338 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे, यजमान संघाने 94 धावांची आघाडी मिळाली, जी निर्णायक ठरू शकते. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला 118 चेंडूत लाबूशेनने 73 धावा फटकावल्या तर स्मिथने 134 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 131 धावांची खेळी केली होती मात्र, दुसऱ्या डावात तो 81 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर कॅमरून ग्रीनने आपले पहिले अर्धशतक ठोकले आणि 84 धावा चोपले. अखेरीस बुमराहने त्याला माघारी धाडलं. कर्णधार टिम पेन नाबाद 39 धावा करून परतला.

दरम्यान, चौथ्या दिवशी कांगारू संघाने डाव घोषित करण्यापूर्वी बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करणाऱ्या मोहम्मद सिराजवर पुन्हा एकदा वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली. ज्यामुळे, काही मिनिटांसाठी खेळ थांबवण्यात आला. सिराजने बाउंड्री लाईनवरच क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणेला याबद्दल माहिती दिली ज्याने मैदानावरील पंचांकडे तक्रार करत त्वरित कारवाईची मागणी केली. प्रेक्षकांमधल्या कोणत्या समुहाकडून ही टिप्पणी करण्यात आल्याचेही सिराजने सांगितलं, ज्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले ज्यांनी या समुहाला स्टेडियम सोडून जायला सांगितलं. यानंतर खेळाला सुरूवात झाली. यापूर्वी, तिसऱ्या दिवसाखेर जसप्रीत बुमराह आणि सिराजवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. ज्याची तक्रार टीम इंडियाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि आयसीसी मॅच रेफ्री यांच्याकडे केली होती.