स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Getty Images)

IND vs AUS 3rd Test Day 2: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) खेळला जात आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे सामन्याच्या दिवशी पहिल्या सत्रात पावसाने व्यत्यय आणला आणि खेळ थांबवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून 213 धावा केल्या होत्या. मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) 91 धावा करून माघारी परतला तर स्टिव्ह स्मिथचे (Steve Smith) सिडनीमधील आणखी एक अर्धशतक पूर्ण केलं आणि नाबाद 52 धावा करून खेळत आहे. लाबूशेन बाद झाल्यावर मॅथ्यू वेड क्रीजवर आला आहे आणि त्याने नाबाद 2 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) संघाला एकमात्र यश मिळवून दिले. लाबूशेनच्या पहिल्या डावात विलो पुकोव्हस्कीसह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीनंतर तिसऱ्या विकेटसाठी स्मिथसह शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. (IND vs AUS 3rd Test Day 2 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)

सिडनी येथील तिसऱ्या टेस्टयामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुखापतीनंतर कमबॅक करणारा डेविड वॉर्नर स्वस्तात माघारी परतला. पण, नवोदित विल पुकोवस्की आणि लाबूशेनच्या शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. या दरम्यान, पुकोवस्कीने आंतरराष्ट्रीय कसोटीमधील पहिले अर्धशतक ठोकले आणि भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, युवा कांगारू फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. भारताचा पदार्पणवीर नाविण सैनीने त्याला 62 धावांवर पायचीत करत माघारी धाडलं. त्यानंतर, लाबूशेन आणि स्मिथच्या जोडीने डाव पुढे नेला व धावसंख्येचा वेग वाढवला. लाबूशेनने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले. पहिल्या दिवसाखेर यजमान संघाने 2 विकेट गमावून 166 धावांपर्यंत मजल मारली.

दुसऱ्या दिवशीही पावसाने खेळात व्यत्यय आणला. मात्र, त्यापूर्वी लाबूशेनला शतक पूर्ण करण्यासाठी 9 धावांची गरज असताना जडेजाचा चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि थेट स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेच्या हातात गेला. अशाप्रकारे लाबूशेन 196 चेंडूत 91 धावा करून माघारी परतला.