IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी कसोटीत पावसाचा व्यत्यय, लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोर एक बाद 21 धावा
सिडनी क्रिकेट ग्राउंड (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 3rd Test Day 1: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पावसामुळे केवळ 7.1 ओव्हरचा खेळ शक्य झाला. दुपारच्या जेवणापयर्यंत ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 21 धावा केल्या आहेत. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण डावाच्या आठव्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूनंतर पावसाने खेळात व्यत्यय आणला आणि खेळाडूंना मैदान सोडून जाण्यास भाग पडले. टॉसनंतर खेळ सुरळीत चालला होता पण अचानक पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. पहिल्या सत्रात पाऊस लपाछपी खेळत राहिला. एकदा खेळ सुरू करण्याची घोषणाही केली पण पाऊस पुन्हा अडथळा ठरला. दुपारच्या जेवणापर्यंत खेळ सुरू होऊ शकला नाही. (IND vs AUS 3rd Test: सिडनी येथे टेस्ट डेब्यूसाठी नवदीप सैनीने ‘या’ गोष्टींमुळे शार्दूल ठाकूर-टी नटराजनविरुद्ध जिंकली रेस, वाचा सविस्तर)

मेलबर्नचा पराभव जिव्हारी लागलेल्या ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्ट सामन्यात 70 टक्के तंदुरुस्त डेविड वॉर्नरला संघात स्थान दिले आहे. शिवाय, युवा फलंदाज विल पुकोवस्कीने भारताविरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं. वॉर्नर आणि पुकोवस्की ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आले, मात्र नवख्या मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराकडे झेल देत वॉर्नर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर, पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. भारताकडून सिराज सध्या एक यशस्वी गोलंदाज ठरला आहे तर यजमान कांगारू संघाकडून मार्नस लाबूशेन नाबाद 2 आणि पुकोवस्की नाबाद 14 धावा करून खेळत आहेत. पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला आहे. शिवाय, लंचनंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात देखील लांबणीवर पडली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे.दोन्ही संघांनी आपल्या मागील प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. वॉर्नर आणि पुकोवस्की ऑस्ट्रेलिया इलेव्हनमध्ये सामील झाले तर भारताकडून रोहित शर्माने दुखापतीनंतर कमबॅक केलं, तर नवदीप सैनीला दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी पदार्पणची संधी मिळाली.