IND vs AUS 3rd Test 2021: सचिन तेंडुलकरच्या ज्या जर्सी नंबरमुळे देशात उडाली होती खळबळ, विल पुकोव्स्कीने तोच जर्सी नंबर घालून केले डेब्यू
विलो पुकोव्हस्की (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 3rd Test 2021: भारताविरुद्ध (India) सिडनी (Sydney) येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये 21 वर्षीय स्टार फलंदाजाची निवड झाल्यानंतर त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी चर्चेत असलेल्या विल पुकोव्स्कीला (Will Pucovski) अखेर कांगारू संघाने सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्यासाठी मैदानावर उतरवले आणि या युवा फलंदाजाने देखील निराश केले नाही. कसोटी करिअरमधील पहिल्या डावात 110 चेंडूंचा सामना करत 62 धावा केल्या. 22 वर्षांच्या विलला प्रथमच ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामने खेळणारा पुकोवस्की 460वा खेळाडू ठरला. अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सामन्यापूर्वी त्याला ऑस्ट्रेलियाची बॅगी ग्रीन कॅप दिली आणि त्याचे संघात स्वागत केले. मात्र, पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पुकोवस्की आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यातले साम्य समोर आले जे फक्त एक योगायोग आहे. (IND vs AUS 3rd Test: सिडनी येथे टेस्ट डेब्यूसाठी नवदीप सैनीने ‘या’ गोष्टींमुळे शार्दूल ठाकूर-टी नटराजनविरुद्ध जिंकली रेस, वाचा सविस्तर)

सिडनीच्या व्हिक्टोरिया संघाकडून खेळणाऱ्या विलचा जर्सी नंबर दहा आहे आणि कसोटी सामन्यात त्याच क्रमांकाची जर्सी घालून त्याने डेब्यू केले. महत्त्वाचे म्हणजे जगातील महान फलंदाजांपैकी एक भारताच्या सचिन तेंडुलकरचा जर्सी नंबर देखील दहा होता. लक्षात घेण्यासारखे म्हणजे,सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बीसीसीआयने 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता, पण भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूर देखील त्याच नंबरच्या जर्सीमध्ये सामना खेळला ज्यावर चाहत्यांनी आक्षेप घेतला. श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात 10 नंबरची जर्सी घातल्यामुळे सचिनच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूरने त्या जर्सीला रामराम ठोकला आणि जर्सीचा नंबर बदलून 54 केला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कसोटी पदार्पणवीर विलने आतापर्यंत एकूण 23 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 6 शतकांसह 1744 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 54 आहे तर सर्वाधिक धावसंख्या नाबाद 255 धावा आहे. या शानदार कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात विलला स्थान देण्यात आलं आहे.