IND vs AUS 3rd ODI: कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल (Manuka Oval) येथे खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील अंतिम वनडे सामन्यात यजमान संघाला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत यजमान संघाला 303 धावांचं तंगड आव्हान दिलं होतं ज्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 289 धावांवर ऑलआऊट झाला. आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करताना भारताकडू कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि नंतर मधल्या फळीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya)-रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी अर्धशतकी कामगिरी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. हार्दिकने नाबाद 92 तर जडेजाने नाबाद 66 धावा केल्या. दोघांनी मिळून अखेरच्या ओव्हरमध्ये तुफान फलंदाजी केली. गोलंदाजांनी मालिकेत पहिल्यांदा प्रभावी कामगिरी करत लक्ष्याचा बचाव केला आणि मालिकेत संघाचा क्लीन स्वीप होण्यापासून रोखले. भारताचे गोलंदाज लयीत परतले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. (IND vs AUS 3rd ODI: कॅनबेरामधील अंतिम वनडेत टीम इंडियाने मारली बाजी, यजमान ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका)
आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी काही महत्तवपूर्ण आकडे नोंदवले. जाणून घ्या:
1. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली. भारताकडून सहाव्या विकेटसाठीची ही तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली. अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिन्नी यांच्यात सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक 160 धावांची भागीदारी झाली आहे, तर युवराज सिंह आणि एमएस धोनी यांनी 158 धावा जोडल्या आहेत.
2. जाडेजाने 50 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना सातव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जाडेजाने स्थान मिळवलं आहे. माजी कर्णधार कपिल देव या यादीत पहिल्या स्थानावर आहेत तर जडेजा दुसऱ्या स्थानावर आहे.
3. कर्णधार विराट कोहली कॅनबेरा सामन्यात 63 धावांचं करू शकला. 2008 मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्याला विराट 11 वर्षानंतर पहिल्यांदा एका कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये शतकी खेळी करू शकला नाही.
4. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत पहिल्या 23 धावा करताच वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 12,000 धावा करण्याचा विराक्म विराटच्या नावे जमा झाला. विराटने 251 सामन्यात तर मास्टर-ब्लास्टर सचिनने 309 सामन्यात हा पराक्रम केला होता.
5. जगातील दुसर्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या पॉवरप्लेमध्ये विकेट न घेता कॅलेंडर वर्ष पूर्ण केले. 2020 मध्ये बुमराहने 9 वनडे सामने खेळले असून 458 धावा देत फक्त 3 विकेट घेतल्या आहेत.
6. हार्दिक पांड्याने कॅनबेरामधील अंतिम सामन्यात वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम डाव खेळला. हार्दिकने नाबाद 90 धावा केल्या. यापूर्वी, त्याने सिडनीमध्ये नाबाद 90 धावा केल्या होत्या.
कॅनबेराच्या आजच्या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी डाव खेळला तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतक ठोकले, पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी क्रम गडगडला.