ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd टेस्ट, एमसीजी (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test Day 1 Stumps: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. पहिल्या दिवशी कांगारू संघाचा डाव 195 धावांवर गुंडाळत पहिल्या दिवसाखेर भारताने 1 विकेट गमावून 36 धावा केल्या आहेत. भारताकडून मयंक अग्रवाल भोपळाही न फोडता माघारी परतला. शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक फलंदाजी केली आणि नाबाद 28 धावा व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 7 धावा करून खेळत आहेत तर संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 159 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) पहिल्या दिवसाखेर 1 विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे कांगारू फलंदाजांनी गुडघे टेकले. मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 48 धावा केल्या तर ट्रेव्हिस हेडने 38 आणि मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने 4, आरसा अश्विन 3, मोहम्मद सिराजला 2 आणि रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd Boxing Day Test Day 1: भारतीय गोलंदाजांपुढे कांगारू संघाने टेकले गुडघे, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला)

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 15 ओव्हरमध्ये त्यांनी मोठ्या विकेट गमावल्या. जो बर्न्स आणि स्टिव्ह स्मिथ शून्यावर माघारी परतले. लाबूशेन आणि ट्रेव्हिस हेडद्या अर्धशतकी भागीदारीने संघाला शंभरी पार करून दिली. मात्र दोन्ही फलंदाज बाद होताच संघाचा डाव अगदी पत्त्यांसारखा कोसळला आणि संघाला पहिल्या डावात 195 धावांपर्यंत मजल मारता आली. लाबूशेनने 132 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 48 तर ट्रॅव्हिस हेडने 92 चेंडूत 38 धावा फटकावल्या. वेडनेही 30 धावा केल्या, या खेरीज कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत एमसीजीमधील कांगारू फलंदाजांच्या नाकी-नऊ आणले आणि 200 धावा करण्यापूर्वी संघाचा डाव गुंडाळला.

बुमराहने जो बर्न्स, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लिऑन यांना माघारी धाडलं. शिवाय, पदार्पणवीर सिराजने घातक लाबूशेनला बाद करत पहिली कसोटी विकेट घेतली. यानंतर त्याने कॅमरुन ग्रीनला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. दुसरीकडे, पहिल्या डावात भारताची सुरुवात चांगली झाली नसली तरी अग्रवालनंतर शुभमन आणि पुजाराने दिवसाखेर आपली विकेट सांभाळली.