नॅथन लायन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 1st Test: अ‍ॅडिलेडमध्ये (Adelaide) सुरु असलेल्या भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू नॅथन लायन (Nathan Lyon) म्हणाला की, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे रनआऊट (Virat Kohli Run Out) मॅचमधील मोठा टर्निंग पॉइंट होता. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताला तीन बाद 188 धावांवर संतुलित दिसत होते, मात्र उपकर्णधार अजिंक्य रहाणेसोबत (Ajinkya Rahane) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार विराट कोहली रनआऊट होत माघारी परतला. विराटने 74 धावा केल्या. आणि जेव्हा दिवसाचा खेळ संपुष्टात आला तेव्हा भारताने 6 विकेट गमावून 233 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर लायनने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की हे अत्यंत महत्वाचे होते. अशाप्रकारे विकेट मिळवणे आणि तेदेखील विराटचे सामन्यातील महत्त्वपूर्ण वळण होते. (IND vs AUS 1st Test Day 2 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅडिलेड टेस्ट मॅच लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल?)

“ते खूप मोठे होते. विराटची रनआऊट खूपच मोठी आहे. अ‍ॅशेसनंतर परत येणे खूप चांगले वाटत आहे. तो खूप चांगली फलंदाजी करीत होता, त्यामुळे खूप आनंद झाला,” लायनने म्हटले. कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशी झालेल्या लढाईबद्दल विचारले असता लायन म्हणाला की, दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे आणि त्याने आव्हानांचा आनंद लुटला. “तिथे चांगली मजा आली, चांगले संभाषण होते पण जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध लढाई आहे. पहिल्या दिवशी एक विकेट एक मोठे आव्हान होते. फिरकी गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करण्यासाठी त्यांची (कोहली आणि पुजारा) शैली आणि दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. मी सर्वोत्तम फलंदाजांविरुद्धच्या आव्हानासाठी नेहमीच सज्ज असतो,” ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने पुढे म्हटले.

दरम्यान, लायनने आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये डेब्यू करणाऱ्या कॅमरुन ग्रीनचे देखील कौतुक केले. 21 वर्षीय खेळाडूने नऊ ओव्हर गोलंदाजी केली आणि केवळ 15 धावा दिल्या. “हे रोमांचक आहे, नाही का? तो अत्यंत प्रभावी आहे. तो एक अपवादात्मक क्रिकेटपटू, प्रेमळ सहकारी असल्याचे मला दिसते आहे, मला त्यांची कंपनी आधीपासूनच आवडली आहे,” लायनने म्हटले. दरम्यान, पुजाराला बाद करणार्‍या लायनने सांगितले की पहिला दिवस निश्चितच समाधानकारक होता पण आम्ही अजून चांगली कामगिरी करू शकलो असतो.