IND vs AUS 1st T20I: रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीने मोडला एमएस धोनीचा रेकॉर्ड, पाहा सामन्यात बनलेले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्
हार्दिक पांड्या आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st T20I: कॅनबेरा (Canberra) येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 11 धावांनी दमदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. भारताने पाहिले फलंदाजी करत दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघ 150 धावांपर्यंतच मजल मारू शकला परिणामी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचे (Indian Team) शिलेदार फ्लॉप ठरल्यावर केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी तुफान फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राहुलने 51 तर जडेजा 44 धावांवर नाबाद ठरला. मात्र, जडेजा भारतीय संघाच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. मोक्याच्या क्षणी जडेजाने शानदार बॅटिंग करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. उपकर्णधार राहुलनेही कामलीची फलंदाजी केली. एकीकडे विकेट पडत असताना राहूलने संयमी खेळ करत अर्धशतकी खेळी केली. (IND vs AUS 1st T20I:युजवेंद्र चहल, टी नटराजनच्या जाळयात अडकले कांगारू; कॅनबेरामध्ये 11 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाची मालिकेत 1-0 ने आघाडी)

दरम्यान, आजच्या सामन्यात काही विक्रमांचीही नोंद करण्यात आली. जाणून घ्या:

1. कॅनबेरामध्ये अर्धशतकी खेळीनंतर राहुलने 45 टी-20 सामन्याच्या 39व्या डावात 1500 धावांचा टप्पा ओलांडला आणि 1500 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं. टी-20 मध्ये भारताकडून रोहित, विराट, शिखर धवन, सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनी यापूर्वी हा टप्पा ओलांडला आहे.

2. राहुलने 39 डावांत 1500 धावा करणाऱ्या विराट कोहलीचीही बरोबरी केली आहे. कोहली, राहुल, बाबर आझम आणि आरोन फिंच यांनी 39 डावांत 1500 धावांचा टप्पा पार केला होता.

3. रविंद्र जाडेजाने अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यासह जाडेजाने एमएस धोनीचा विक्रमही मोडला आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता जाडेजाच्या नावावर जमा झाला आहे. जडेजाने नाबाद 44 तर धोनीने इंग्लंडविरुद्ध 2012 मध्ये 38 धावा केल्या होत्या.

4. रवींद्र जडेजाने आजचा टी-20 कारकिर्दीतील 50वा सामना खेळला. रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली, युवराज सिंह, सुरेश रैना, शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांनी 50हुन अधिक टी-20 सामने खेळले आहेत.

5. विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने सलग 9वा टी-20 विजय नोंदवला. यापूर्वी, न्यूझीलंड दौऱ्यावर त्यांनी पाच टी-20 सामने जिंकले ज्यात दोन सुपर ओव्हर सामन्यांचाही समावेश आहे.

6. युजवेंद्र चहल टी-20 मध्ये भारताचा पहिला कन्क्शन सब्स्टिट्यूट ठरला. रवींद्र जडेजाला फलंदाजी दरम्यान चेंडू लागल्यानंतर चहल दुसऱ्या डावात मैदानावर उतरला.

दरम्यान, पहिल्या टी-20 नंतर दोन्ही संघ आता 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आमने-सामने येतील. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, या मैदानावर पहिले दोन वनडे सामने खेळवले गेले असून टीम इंडियाला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे, भारतीय संघ पूर्ण तयारीने सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील.