IND vs AUS 1st T20I: Mitchell Swepson याचा विराट कोहली ऑस्ट्रेलियामधील बनला पहिला शिकार, पाहून टीम इंडिया कर्णधाराने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)
मिशेल स्वीपसन आणि विराट कोहली (Photo Credit: Twitter/cricketcomau)

IND vs AUS 1st T20I: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल येथील पहिल्या टी-20 भारताची (India) सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 48 धावांवर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) दोन मोठ्या विकेट गमावल्या. मिशेल स्वीपसनने (Mitchell Swepson) कॅप्टन विराटला झेलबाद केले. फिरकीपटू स्वीपसनच्या गोलंदाजीवर खेळताना बॉल विराटच्या बॅटची कड घेऊन हवेत उडाली आणि गोलंदाजाने सोपा झेल पकडत विराटला स्वस्तात माघारी धाडलं. विराटची विकेट स्वीपसनसाठी संस्मरणीय ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळताना विराट स्वीपसनचा पहिला शिकार ठरला. मिशेलने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्वीपसनने यंदा उन्हाळ्यात बरीच गोलंदाजी केली आहेत जी आतापर्यंत खूपच प्रभावी ठरली आहे पण भारतीय संघाच्या कर्णधाराची विकेट कारकिर्दीतील मोठी विकेट ठरली. (IND vs AUS 1st T20I: केएल राहुल, रवींद्र जडेजाची तुफान बॅटिंग, ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्‍यापुढे फलंदाजांचा फ्लॉप शो; टीमने दिले 162 धावांचे आव्हान)

शिवाय, एका नवख्या गोलंदाजाकडून आऊट झाल्यावर स्वतः विराटही आश्चर्यचकित झाला. विराट आऊट झाल्यावरही काही काळ खेळपट्टीवरच चकित उभा राहिला आणि नंतर मैदानाबाहेर जाण्यासाठी चालू लागला. 9 चेंडूत 9 धावा करत भारतीय कर्णधार माघारी परतला.

वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. पहिल्या टी-20 सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 161 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर आपले वर्चस्व कायम ठेवले, पण जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. जाडेजाने 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 44 धावा केल्या. जडेजाने हार्दिक पांड्यासोबत फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, पण पंड्या हेनरिक्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद बाद झाला. यानंतर जडेजाने उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेनरिक्सने सर्वाधिक ३ तर स्वीपसनला तर मिशेल स्टार्क आणि अ‍ॅडम झांपा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.