IND vs AUS 1st ODI: डेविड वॉर्नर-आरोन फिंच यांनी उडवला भारताचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाचा 10 विकेटने विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी
आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि पहिले फलंदाजी करत भारतीय संघ (Indian Team) 49.1 ओव्हरमध्ये 255 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी, डेविड वॉर्नर (David Warner) आणि फिंचने भारतीय गोलंदाजांची क्लास घेतली. दोंघांनी द्विशतकी भागीदारी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 10 विकेटने धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. वॉर्नर आणि फिंच अनुक्रमे 128, 110 धावांवर नाबाद परतले. वॉर्नरने 88 चेंडूत, तर फिंचने 109 चेंडूत शतक पूर्ण केले. वॉर्नर आणि फिंचने संघाला चांगली सुरुवात करून देत टीम इंडियाच्या गोलदाजांवर वर्चस्व कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतीयगोलंदाज विकेटच्या शोधात राहिले. (Video: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये अ‍ॅडम झांपा याने आपल्याच चेंडूवर पकडला विराट कोहली याचा अफलातून कॅच)

टॉस जिंकल्यानंतर फिंचएच्या पाहिले गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी योग्य ठरवलं. ऑस्ट्रेलियाने भारताला 255 धावांवर ऑलआऊट केले. शिखर धवन याने भारताकडून 74 धावांची शानदार खेळी केली, तर केएल राहुल 47 धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यावर कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 3, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसनने 2-2 गडी बाद केले. चौथ्या क्रमांकावर आलेला कर्णधार विराट कोहली काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने 4 च्या वैयक्तिक धावावर विकेट गमावली. रवींद्र जडेजा ही 25 धावांवर बाद झाला. टीम इंडियाने 13 धावांवर पहिली गडी गमावली, पण राहुल बाद झाल्याने भारताची फलंदाजी ऑर्डर कोसळली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी एकही फलंदाजाला जास्त वेळ खेळपट्टीवर राहू दिले नाही.

यानंतर दोन्ही संघ आता राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 17 जानेवारीला आमने-सामने येतील. हा सामना टीम इंडियासाथी करो-या-मारोचा असेल, कारण या सामन्यात पराभव झाल्यास भारताला मालिकेत पराभवाचा सामना करावा लागेल.