IND v ENG 2nd Test 2021: इंग्लंड संघाची कमाल! टीम इंडियाला दिली नाही एकही Extra धाव, मोडला तब्बल 66 वर्षे जुना वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND v ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चेन्नईच्या (Chennai) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात अतिरिक्त म्हणून 52 धावा दिल्या. त्याच मैदानावरील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने (England Team) नवीन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. इंग्लंड संघाने अतिरिक्त धावा म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करून पाकिस्तानला मागे टाकले आहे. रविवारी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात एकही अतिरिक्त न देता विश्वविक्रमी कामगिरीची नोंद केली. पहिल्या डावात भारताने 329 धावा केल्या आणि सर्व धावा भारतीय फलंदाजांनी केल्या. अशा प्रकारे, संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे, ज्यामध्ये एकाही अतिरिक्त धावाचा समावेश नाही. जो की एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. (IND vs ENG 2nd Test Day 2: भारतीय गोलंदाजांचा इंग्लंडला दणका, लंचपर्यंत England 4 बाद 39 धावा; टीम इंडियाची 290 धावांनी आघाडी)

यापूर्वी, पाकिस्तान संघाच्या नावावर 1954/55 मध्ये या रेकॉर्डची नोंद करण्यात आली होती. 1954/55 लाहोर येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध 328 धावा केल्या होत्या ज्यामध्ये एकही अतिरिक्त धाव नव्हती. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 6 विकेट्ससाठी 300 धावा केल्या, पण चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी केवळ 29 धावा घेत अखेरचे 4 विकेट गमावले. रिषभ पंत 58 धावांवर नाबाद राहिला, परंतु उर्वरित फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. यजमान संघाने रोहित शर्माने सर्वाधिक 161 धावा केल्या तर अजिंक्य रहाणेने 67 आणि चेतेश्वर पुजाराने 21 धावांचा शानदार डाव खेळला. मोईन अली इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोईनने 128 धावा देत 4 विकेट घेतल्या. इंग्लंडने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत मालिकेचा सलामीचा सामना 227 धावांनी जिंकला.

दरम्यान, चेन्नई कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 6 बाद 300 धावांपासून खेळत 329 धावांपर्यंत मजल मारली. रिषभ पंतने अर्धशतक झळकावत भारताचा डाव लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यानंतर, इंग्लंडची देखील अडखळत सुरुवात झाली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे पहिल्या सत्राखेर इंग्लंडने 39 धावांवर 4 विकेट गमावले आहेत. आर अश्विनने 2 तर अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येक एक विकेट मिळाली.