आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यात भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात महामुकाबला रंगणार आहे. बहुप्रतिक्षित सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) येथील द रोज बाउल क्रिकेट स्टेडियमवर 18 जून 2021 रोजी सुरू होईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पॉईंट टेबलमध्ये भारत आणि न्यूझीलंडने अव्वल दोन स्थान पटकावले व आयसीसीच्या कसोटी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात प्रवेश निश्चित केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडने निश्चितच अतुलनीय कामगिरी बजावली असली तरी हे लक्षात घ्यावे लागेल की आयसीसीच्या (ICC) नियमात बदल केल्यामुळे किवी संघाला पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान गाठता आले. (ICC WTC Final 2021: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, फायनल सामन्यापूर्वी या किवी फलंदाजाने इंग्लंडमध्ये केला कहर)
आयसीसीचा हा नियम इंग्लंडसाठी गैरसोयीचा ठरला आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत किवी संघापेक्षा अधिक गुण असूनही इंग्लिश टीम फायनल सामन्यात प्रवेश करू शकली नाही. कोविड-19 महामारीमुळे या स्पर्धेच्या नियमात सुधारणा करावी लागली आणि नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीने स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण नियम बदलला. या नव्या नियमानुसार संघाने जे गुण मिळवले आहेत त्या टक्केवारीनुसार (पीसीटी) त्यांची यादी केली जाईल. या नियमाचा सर्वात मोठा फटका इंग्लंड संघाला (England Cricket Team) बसला तर किवी संघाला फायदा झाला. जेव्हा नवीन नियम लागू झाला तेव्हा इंग्लंडने 4 द्विपक्षीय मालिका खेळल्या होत्या आणि श्रीलंका व भारत दौऱ्यावर फक्त दोन मालिका शिल्लक होत्या. दुसरीकडे न्यूझीलंडला मोठा फायदा झाला कारण त्यांच्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान वीरोहात फक्त दोन द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या.
त्यामुळे सध्याच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉईंट टेबलवर नजर टाकल्यास इंग्लंडचे 442 गुण आहेत तर न्यूझीलंडचे 420 गुण आहेत. त्यामुळे, आधीच्या नियमाच्या आधारावर (गुण) अंतिम दोन संघाची निवड केली गेली असती तर इंग्लंडला दुसरा क्रमांक मिळाला असता आणि ते फायनलसाठी पात्र ठरले असते. गुणांच्या टक्केवारीच्या नियमाने इंग्लंडला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर काढले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.