टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

ICC World Test Championship Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021 फायनल सामन्यासाठी एका संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, परंतु दुसरा संघ कोण असेल याचा निर्णय आता भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील कसोटी मालिकेच्या अखेरीस येईल. न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाने वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे, परंतु तीन संघांचे नशिब अद्याप खुलं आहे, जो किवी संघाला या कसोटी चॅम्पियनशिपच्या (Test Championship) अंतिम सामन्यात टक्कर देईल. या तीन संघात भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघाचा समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई (Chennai) येथे खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांनंतरही कोणता संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, या मालिकेपूर्वी 15 शक्यता दिसत होत्या, ज्यानुसार तीन संघापैकी कोणतीही संघ अंतिम फेरी गाठेल असे दिसत होते मात्र, आता दोन सामन्यानंतर फक्त 5 परिदृश्य बाकी आहेत, ज्याने कोणत्या संघाकडे कशी संधी आहे ते दिसून येते.

भारत आणि इंग्लंड यांच्यात दोन सामने असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. भारत-इंग्लंडमधील मालिका अनिर्णीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. शिवाय, इंग्लंडने मालिका 2-1 अशी जिंकल्यासही कांगारू संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. दुसरीकडे, इंग्लंड संघाला टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी शिल्लक दोन्ही सामन्यात विजय मिळवून मालिका 3-1 अशा फरकाने जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यजमान टीम इंडियाला फायनल फेरीत न्यूझीलंडला टक्कर द्यायची असल्यास त्यांना इंग्लिश टीमचा 2-1 किंवा 3-1 पराभव करणे गरजेचे आहे असे न झाल्यास अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीतून 'विराटसेने'वर बाहेर पडण्याचे संकट ओढवेल. इतकंच नाही तर भारतीय संघाने जर आणखी एक सामना जिंकला आणि पुढील सामना अनिर्णीत राहिला तरीही ते अंतिम सामन्यात पोहचू शकतात.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काही बदल झाले आहेत. भारतीय संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली तर इंग्लंडची चौथ्या स्थायी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा संघ प्रथम स्थानावर आहे आणि चेन्नई कसोटी जिंकून भारताने 69.7 विजयी टक्केवारीसह दुसरे स्थान पटकावले आहे.