ICC Women's World Cup 2022 Semifinal Qualification: आता ICC महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 चे शेवटचे सहा साखळी सामने बाकी आहेत. सलग सहा सामने जिंकून साखळी फेरीत आतापर्यंत अजेय ऑस्ट्रेलिया (Australia) सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ आहे, तर इतर तीन संघांपैकी कोणते उपांत्य फेरीत पोहोचतील यावर अजूनही सस्पेंस शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत कायम राहणार आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर यजमान न्यूझीलंडसाठी देखील उपांत्य फेरीचा रस्ता काट्याने भरलेला आहे. तसेच बांगलादेशविरुद्ध मोठ्या विजयाने मिताली राज अँड कंपनीचा रस्ता थोडा सोपा झाला आहे. आणि गुरुवारी दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज महिला (West Indies Women) यांच्यात सामना रंगणार असून, Proteas महिलांच्या विजयाने भारतीय संघाची (Indian Team) सेमीफायनल वाट आणखी सुकर होईल. (ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषक सामन्यांमध्ये आता 100 टक्के प्रेक्षकांना मिळणार एन्ट्री, ICC ने क्रिकेट चाहत्यांना दिली खुशखबर)
आयसीसी महिला विश्वचषकच्या पॉइंट टेबलमध्ये भारताचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियानंतर सध्या सर्वोत्तम आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल. तथापि जर दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाची नोंद केली, तर भारताचा उपांत्य फेरीतील मार्ग सुकर होईल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा झाल्यानंतरही त्यांनी सेमीफायनल गाठण्याची शक्यता अधिक आहे. महिला विश्वचषकच्या सेमीफायनल पात्रतेच्या शक्यतांबद्दल बोलायचे तर समजा न्यूझीलंडने त्यांचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकला आणि इंग्लंडने त्यांचे उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकले तर भारत, न्यूझीलंड आणि विंडीज यांचे प्रत्येकी सहा गुण होतील. याशिवाय इंग्लंडच्या खात्यात आठ गुण असतील. अशा स्थितीत चांगल्या नेट रनरेटच्या आधारे भारत विंडीज आणि न्यूझीलंड संघाच्या वरचढ ठरेल.
मिताली राज हिच्या टीम इंडियाने सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात मिश्र कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 3 सामने जिंकले आणि तितक्याच सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने जवळपास सेमीफायनल प्रवेश निश्चित केला आहे आणि विंडीज महिलांविरुद्ध विजय यावर फक्त शिक्कामोर्तब करण्याचे काम करेल. Proteas महिलांनी खेळले 5 पैकी 4 सामने वर्चस्वपूर्ण खेळ करून जिंकले आहेत.