ICC Women's Team Rankings: टी-20 क्रमवारीत भारतीय महिला टीमची दुसऱ्या स्थानी झेप; वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचे पहिले, तर टीम इंडियाचे तिसरे स्थान कायम
भारतीय महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Women's Team Rankings: कोरोना काळात पुरुष क्रिकेटसह आंतरराष्टीय महिला क्रिकेटला देखील सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला व इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनंतर आयसीसीने (ICC) प्रत्येक संघांची क्रमवारी जाहीर केली आहे. वनडे आणि टी-20 रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिलांच्या संघ क्रमवारीत (ICC Women's Team Rankings) अव्वल स्थान कायम राखले आहे, तर टी-20 क्रमवारीत न्यूझीलंड महिला टीमला (New Zealand Women's Team) मागे टाकून भारतीय महिला टीमने (India Women's Cricket Team) तिसरे स्थान पटकावले आहे. वनडे रँकिंगमध्ये सहा वेळा आयसीसी महिला वर्ल्ड चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियाच्या (Australia) रेटिंगच्या कालावधीत 21 वनडेच्या 20 सामन्यात विजयी झाल्यामुळे त्यांचे गुण आठ गुणांनी वाढून 160 गुण झाले आहेत. भारत (121) आणि इंग्लंड (119) यांनी अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर झेप घेतली असली तरी त्यांचे प्रत्येकी चार गुण कमी झाले आहे, तर दक्षिण आफ्रिकाने न्यूझीलंडविरुद्ध 13-गुणांची आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिज, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका त्यांच्या मागावर आहेत.

टी-20 क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया 291 गुणांसह पहिल्या तर इंग्लंड 280 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत पराभवानंतर न्यूझीलंडची एक स्थानावरून घसरण झाली तर भारतीय महिला टीमने तिसरे स्थान पटकावले. मार्चमध्ये यावर्षीच्या महिलांच्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मजल मारलेल्या टीम इंडियाच्या क्रमवारीतील बदल पहिल्या 15 मध्ये झालेला एकमेव बदल आहे.

दुसरीकडे, खेळाडूंच्या टी-20 क्रमवारीत भारतीय महिलांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पहिल्या टॉप-10 फलंदाजांमध्ये शेफाली वर्मा, स्मृती मंधाना आणि जेमीमाह रॉड्रिग्ज सामील आहेत. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी, न्यूझीलंडची सुझी बेट्स दुसर्‍या क्रमांकावर, तर भारताची शेफाली वर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. 7व्या क्रमांकावर भारतीय फलंदाज मंधाना आणि 9व्या क्रमांकावर रॉड्रिग्ज आहेत. टी-20 गोलंदाजांच्या यादीत भारतीय खेळाडू 6,7 आणि 8व्या क्रमांकावर आहेत. दीप्ती शर्मा सहाव्या, तर 704 गुणांसह राधा यादव सातव्या स्थानी आहे. तर, भारतीय खेळाडू पूनम यादव 698 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.