(Photo Credit: Getty)

आगामी आयसीसी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक जाहीर जाहीर झाले आहेत. रविवारी थायलंड आणि बांगलादेश या स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे या जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व देशांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. बांगलादेश महिला संघाने स्कॉटलंडमध्ये पात्रता स्पर्धा जिंकली आणि आता वर्ल्ड कपसाठी गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात गतविजेते ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका संघाचा समावेश आहे. दुसरीकडे, 12 वर्षांपूर्वी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या थायलंडच्या संघाने विश्वचषकात पात्रता मिळवून इतिहास रचला. या संघाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानसमवेत गट बमध्ये स्थान देण्यात आले आहे.

थायलंडची टीम पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचली पण, फायनलमध्ये त्यांना बांगलादेशकडून 70 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता 22 फेब्रुवारीला थाई संघ पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करेल. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्च रोजी मेलबर्न येथे होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. पुढील वर्षीच ऑस्ट्रेलियामध्ये पुरुष टी-20 विश्वचषकदेखील खेळला जाणार आहे, यात 16 संघ भाग घेतील. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाईल. यात भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळेल आणि त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानच्या सामन्यात होईल.

10 संघांच्या या स्पर्धेत 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 वर्ल्ड कपच्या पहिल्या 8 संघांना थेट प्रवेश मिळाला होता तर उर्वरित दोन संघांनी पात्रता मिळवून प्रवेश केला होता. भारतीय संघाचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी यजमान ऑस्ट्रेलियाशी होईल. त्यानंतर 24 तारखेला भारतीय संघ बांगलादेश सोबत खेळेल. भारतीय संघ 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडशी तर शेवटच्या गटातील सामन्यात 29 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळेल. बीसीसीआयने या विश्वचषकसाठी भारतीय महिला संघाची घोषणा आधीच केली आहे. तुफान खेळी करणारी हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल तर उपकर्णधार म्हणून स्मृती मंधाना हिची देखील वर्णी लागली आहे. मंधानासह महाराष्ट्राची जेमीमाह रॉड्रिग्ज आणि अनुजा पाटील यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.